द्राक्षांचा हंगाम बहरात   

दर आवाक्यात; ग्राहकांकडून मागणी वाढली

 
पुणे : द्राक्ष हे लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच आवडणारे फळ. त्यामुळे या फळाची सर्वांनाच उत्सुक्ता असते. आंबट-गोड द्राक्षांचा हंगाम आता बहरात आला आहे. पुणे जिल्ह्यासह, नगर, सातारा, सांगली भागातून द्राक्षांची बाजारात आवक वाढली आहे. सांगलीतील तासगाव परिसरातील द्राक्षांना ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
 
मार्केट यार्डातील फळ  बाजारात दररोज 12 ते 15 टन द्राक्षांची आवक होत आहे. मार्केटयार्डातील फळबाजारात होत असलेल्या आवकेच्या 
तुलनेत सर्वाधिक आवक सांगली जिल्ह्यातून होत आहे. डिसेंबर महिन्यात द्राक्षांचा हंगाम सुरू झाला. मार्च महिन्यापर्यंत द्राक्षांचा हंगाम सुरू राहणार आहे. आंब्याची आवक वाढल्यानंतर द्राक्षांची आवक टप्याटप्याने कमी होत जाते. सद्य:स्थितीत द्राक्षाची आवक वाढली असली, तरी ग्राहकांकडून द्राक्षांना चांगली मागणी असल्याचेही अरविंद मोरे यांनी नमूद केले. 
 
गेल्या दहा ते पंधरा दिवसांत द्राक्षांची आवक वाढली आहे. तपमानात वाढ झाली असल्याने द्राक्षांची गोडी वाढली आहे. द्राक्षांचे दर स्थिर आहेत लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील किरकोळ विक्रेत्यांकडून द्राक्षांना मागणी वाढली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विक्रेत्यांकडून द्राक्षांना मागणी आहे. फेब्रुवारी महिन्यात द्राक्षांची आवक आणखी वाढणार आहे. यंदा द्राक्षांसाठी हवामान चांगले आहे. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला आहे. फळांना गोडीही वाढली आहे. आवक आणखी वाढल्यास दरात घट होवू शकते. मात्र यंदा द्राक्ष सर्वासामान्यांच्या आवाक्यात राहतील, असेही अरविंद मोरे यांनी सांगितले.
 

घाऊक बाजारात दहा किलो द्राक्षांचे दर

 
द्राक्ष दर
सुपर सोनाका 400 ते 600 रुपये
तास ए गणेश 300 ते 450 रुपये
माणिक चमन 300 ते 450 रुपये
जंबो (काळी द्राक्षे) 300 ते 700 रुपये
 

Related Articles