राजकीय प्रचार (अग्रलेख)   

काँग्रेसच्या एका नेत्याने दक्षिण विरुद्ध उत्तर भारत, असे उथळ विधान केले. आणखी किती दिवस तुकड्यांमध्ये विचार करणार? हा सवाल मोदी यांनी केला. मात्र, त्यांचा पक्ष आणखी किती काळ भूतकाळातील पंतप्रधानांना जबाबदार ठरविणार? याचेही उत्तर मिळावे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावरील चर्चेस उत्तर देताना त्यांनी केलेले भाषण याचे उत्तम उदाहरण. पंतप्रधानपदाच्या त्यांच्या दुसर्‍या कारकिर्दीतील हे शेवटचे संसद अधिवेशन होते. सलग दुसर्‍यांदा भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्ता स्थापनेची संधी मिळाली. दहा वर्षांचा हा कालखंड थोडाथोडका नव्हे. अशावेळी आपल्या सरकारच्या आजवरच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकून त्यांनी भाषण केले असते तर सकारात्मक संदेश गेला असता. आधीच्या जनसंघाने आणि नंतर भारतीय जनता पक्षाने जे - जे मुद्दे वर्षानुवर्षे अग्रक्रमाने आणि आक्रमकपणाने देशासमोर मांडले त्यापैकी अनेक मुद्दे मोदी सरकारने मार्गी लावले. कलम 370 रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी, राम मंदिराची उभारणी यांसह विविध विषयांचा त्यात समावेश आहे. कल्याणकारी योजनांचा भाजप सरकार सातत्याने प्रचार करत असते. या विषयांवर न बोलता केवळ पंडित नेहरु आणि काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांवरील टीकेतून काय साध्य झाले? काँग्रेस आज भाजपला स्वबळावर आव्हान देण्याच्या स्थितीत नक्कीच नाही; पण पंतप्रधानांच्या टीकेचा अर्थ काँग्रेसची भाजपला धास्ती वाटते, असा घेतला गेला तर चुकीचे नाही! 
 
संकेतांची पायमल्ली
 
नेहरू यांनी देशवासीयांना आळशी म्हणून हिणवले की, त्यांना उणिवा दाखवून कार्यप्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, याचे उत्तर विचारधारांच्या चष्म्यातून दिले जाऊ नये. संरक्षण क्षेत्रात भारताने भरारी घेतली. त्याचा पाया विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पहिल्या पंतप्रधानांनी केलेल्या संशोधन संस्थांच्या उभारणीत आहे. आणीबाणी वगळता इंदिरा गांधी यांच्यात दोष दाखवावेत, असे चित्र नव्हते. बड्या देशांच्या कच्छपी न लागता भारताने स्वतंत्रपणे वाटचाल सुरु ठेवली, हे इंदिरा गांधी यांच्यामुळे घडू शकले. दहा वर्षांपूर्वी केंद्रातील सत्तेतून फेकल्या गेलेल्या काँग्रेसवर टीकेचे आसूड ओढत राहणे ही भाजपसाठी राजकीय अपरिहार्यता आहे, मात्र त्यात भूतकाळातील नेत्यांना ओढण्याचे कारण नाही. पंडित नेहरू यांच्यामुळे जम्मू-कामीरमधील जनतेला त्रास सहन करावा लागला, ही संघ परिवार आणि भाजपची पूर्वापार भूमिका आहे. कलम 370 रद्द करून आपण त्रासातून सुटका केली असे भाजप मानतो; पण तेथे निवडणुका व्हाव्यात आणि हे मात्र भाजपला त्रासाचे वाटते! आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 जागा मिळतील, असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केले. निवडणुकांचा संदर्भ, जागांचे अथवा विजयाचे गणित हे मांडण्याची संसद ही जागा नाही. देशाच्या सरकारचे प्रमुख म्हणून मोदी यांनी बोलणे, देशासमोरील आव्हानांचा उहापोह करणे अपेक्षित होते; मात्र प्रत्येक बाब निवडणुकीच्या दृष्टीतून पाहिली जाते आणि राजकीय प्रचारासाठी संसदेच्या व्यासपीठाचा वापर केला जातो. विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ हे नाव भाजपच्या नेतृत्वाला झोंबले. आता आघाडीची पायाभरणी करणारे नितीशकुमार भाजपबरोबर असले तरी या आघाडीमुळे भाजपची वाढलेली चिंता कमी झालेली नाही. मोदी यांनी या आघाडीवर टीका करताना आघाडीतील मतभिन्नतेचा ठपका काँग्रेसवर ठेवला. संसदेत विरोधक मोदी यांच्या विरोधात कायम आक्रमक आणि मोदी आणि त्यांचे सहकारी सतत प्रचारी भूमिकेत, हेच चित्र दहा वर्षे कायम राहिले आहे. संसदेचे व्यासपीठ प्रचारी भाषणासाठी वापरणे हा संकेताचा भंग आहे. त्यावर बोलण्याऐवजी मतदान यंत्रांबद्दल खात्री असल्याने मोदी 400 जागा मिळविण्याचा दावा करतात, ही काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांची प्रतिक्रियाही अपरिपक्वपणाची होय.
 

Related Articles