‘शक्‍ती’ने जिंकला ग्रॅमी पुरस्कार   

शंकर महादेवन, झाकीर हुसेन, चौरसिया यांचा सन्मान

 
नवी दिल्ली : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन आणि सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या ‘शक्‍ती’ या फ्यूजन बँडच्या ‘धीस मोमेंट’ या अल्बमने सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम 2024 चा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे.
 
ग्रॅमी हा संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मानला जातो. 66 वा ग्रॅमी अवॉर्ड सोहळा रविवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30) अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये पार पडला. ‘शक्‍ती’ या फ्यूजन बँडमध्ये शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या व्यतिरिक्त सेल्वगणेश विनायकराम, गणेश राजगोपालन जॉन मॅक्लॉफलिन यांचा समावेश आहे. त्यांनाही ग्रॅमी पुरस्कार मिळाला. 
 
दरम्यान, झाकीर हुसेन यांनी बेला फ्लेक आणि एडगर मेयर यांच्यासह ‘पश्तो’साठी ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ या श्रेणीअंतर्गत ग्रॅमी पटकावला. यामध्ये सर्वोत्कृष्ट बासरीवादक राकेश चौरसिया यांचीही साथ मिळाली. त्यांनाही ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाला. हुसेन यांनी या सोहळ्याच्या एका रात्रीत तीन ग्रॅमी जिंकले, तर चौरसिया यांनी दोन पुरस्कारांवर नाव कोरले. 
 
संगीतकार व ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांनी ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. उस्ताद झाकीर हुसेन यांनी एका रात्रीत तीन ग्रॅमी जिंकून इतिहास घडविला. तर राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. हे भारतासाठी ग्रॅमी पुरस्कारामधील सर्वोत्तम वर्ष आहे. या क्षणाचे मला साक्षीदार होता आले, याचा आनंद आहे, असे रिकी केज यांनी म्हटले आहे.
 

Related Articles