४०० जागा जिंकणार : मोदी   

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 400 हून अधिक जागा मिळतील. तर, भाजप किमान 370 जागा जिंकेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला.विरोधी पक्षांनी निवडणूक लढण्याची हिंमत गमावली आहे. त्यांनी दीर्घकाळ विरोधी बाकावर राहण्याचा संकल्प केला आहे, असा टोलाही मोदी यांनी लगावला.
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत चर्चेला उत्तर देताना मोदी म्हणाले, मी देशवासीयांच्या मनात काय आहे, याचा अंदाज लावू शकतो. ते निश्‍चित एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा आणि भाजपला 370 जागा जिंकून देतील. भाजप तिसर्‍यांदा सत्तेत येण्यापासून आता फार दूर नाही, असे सांगतानाच त्यांनी लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, याचे संकेत दिले. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मला नेहमीच वाटते. हे निवडणुकीचे वर्ष आहे, थोडे तरी कष्ट करा, काहीतरी नवीन घेऊन या. त्याच त्याच जुन्या गोष्टी आणू नका, अशी टीकाही त्यांनी केली.
 
विरोधकांनी दीर्घकाळ विरोधी बाकावर राहण्याचा संकल्प केला आहे,  असे सांगतानाच पुढच्या निवडणुकीनंतर विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील, असा टोलाही लगावला. अंदाजपत्रकी अधिवेशन विरोधकांसाठी चांगली संधी होती. मात्र, विरोधांनी ही संधीदेखील गमावली. तुम्ही देशाचा भ्रमनिरास केला. नेते बदलले पण तोच सूर कायम ठेवलात, असेही मोदी म्हणाले.
 

नेहरूंसह काँग्रेसवर टीकास्त्र

 
भारतीय आळशी आणि कमी बुद्धिमत्तेचे आहेत, असे विचार पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू यांच्यावर टीका केली. सुमारे 100 मिनिटांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली. काँग्रेसने कधीच भारताच्या शक्‍तीवर विश्‍वास ठेवला नाही. काँग्रेस कायम घराणेशाहीत रमली. नागरिकांच्या आकांक्षा आणि प्रगतीचा कधीच विचारच केला नाही. कायमच सत्ताधीश असल्याच्या अविर्भावात काँग्रेस वावरली. नागरिकांकडे कायम दुर्लक्ष केले. 
 

Related Articles