मतपत्रिका आणि व्हिडीओ सुरक्षित ठेवा   

सर्वोच्च न्यायालायचा आदेश : चंडीगढ महापौर निवडणूक

 
नवी दिल्ली : चंडीगढ महापालिका निवडणुकीतील मतपत्रिका आणि निवडणूक प्रक्रियेचा व्हिडीओ सुरक्षित  जतन करुन ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला दिले. आता पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चंडीगढ महापालिका निवडणुकीत मतपत्रिकांत फेरबदल करण्यात आला असा आरोप आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी केला होता. ‘आप’चे महापौर पदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या अर्जावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा पीठासमोर सुनावणी पार पडली.
 

लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही...

 
निवडणूक प्रक्रियेचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. या व्हिडीओमध्ये रिटर्निंग अधिकारी मतपत्रिकेवर फेरफार करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. जे काही घडले ते पाहून आम्ही आश्‍चर्यचकीत झालो. आम्ही लोकशाहीची अशी हत्या होऊ देणार नाही, असेही सरन्यायाधीश म्हणाले. मतपत्रिका आणि कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षितपणे जतन करुन ठेवा, असे आदेशही त्यांनी दिले. चंडीगढच्या महापौरपदासाठी 30 जानेवारी रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजप उमेदवार मनोज सोनकर यांनी ‘आप’चे उमेदवार कुलदीप कुमार यांचा पराभव केला होता. सोनकर यांना 16, कुमार यांना 12 मते पडली. तर, 8 मते अवैध ठरली.
 

Related Articles