आरोप सिद्ध झाल्यास राजकारणासोबत झारखंडही सोडेन   

रांची : माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असून, मी निर्दोष आहे. जर माझ्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले, तर राजकारणासोबत झारखंडही सोडेन, असे  आव्हान झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपला दिले. यावेळी आपल्या अटकेची स्क्रिप्ट अगोदरच लिहिली असून, राजभवनचाही त्यात सहभाग  होता, असा आरोपही त्यांनी केला. 
 
झारखंडचे नवीन मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यादरम्यान, हेमंत सोरेन यांनी सभागृहात भाषण करताना सांगितले की, भाजप आदिवासींचा द्वेष करते. जे जंगलात होते, त्यांनी जंगलातच राहिले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. हे लोक आम्हाला अस्पृश्य मानतात. म्हणून आम्ही अद्याप पराभव स्वीकारलेला नाही. आम्ही अश्रूही ढाळणार नाही. आम्ही आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत. त्यांच्या प्रत्येक कटाला उत्तर दिले जाईल
 
देशात पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांना 31 तारखेच्या रात्री अटक करण्यात आली आहे. 31 जानेवारीची रात्र ही देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात काळी रात्र म्हणून लिहिली जाईल. ही घटना घडवण्यात राजभवनचाही कुठेतरी सहभाग आहे, असे मला वाटते. दरम्यान,सोरेन सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची परवानगी दिली होती.
 

Related Articles