धोम धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड   

सातारा, (वार्ताहर) : धोम धरणाच्या उजव्या कालव्याला व्याजवाडी हद्दीत पहाटे चार वाजता भगदाड पडल्याने शेकडो क्युसेक पाणी वाहून गेले. कालवा ओढ्यावर फुटल्याने शेती वाहून जाण्याचे मोठे नुकसान टळले. यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येणार आहे. धोम धरण पाटबंधारे विभागाने वेळीच कालवा दुरुस्त केला असता, तर ही दुर्घटना टळली असती. रात्री कालवा फुटण्याच्या घटनेने ओढ्यालगत राहणार्‍या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.
 
कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी शासनाच्या दरबारी पाटबंधारे खात्याचे संबंधित अधिकारी निधीचा पाठपुरावा करीत आहेत; परंतु कृष्णा खोर्‍याच्या जलसिंचन विभागाकडून उदासीनता असल्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळताना अडचणी निर्माण होत असल्याने पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येत आहे. शासनाने निधीची कमतरता भासू देणार नाही, अशा वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून धोम धरणाच्या कालव्यासाठी निधीची तरतूद करावी, जेणेकरून पुढील तीन ते चार महिन्यांत पाण्याच्या टंचाईचा सामना करताना अडचणी येणार नाहीत. जिल्ह्यातून पाच तालुक्यांतील हजारो एकर जमीन या कालव्यावर अवलंबून आहे, तरी आमदार मकरंद पाटील यांनी संसदेत हा प्रश्‍न मांडून पाटबंधारे खात्याला निधी उपलब्ध करून द्यावा व त्वरित कालवा दुरुस्त करून चालू हंगामाचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद केले असले, तरीही दुपारी तीनपर्यंत पाणी ओढ्यात वाहून जात होते. दोन महिन्यांत दोन मोठ्या घटना घडल्याने संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईचे चित्र वाई तालुक्यात पुढे भासणार आहे, असे दिसून येत आहे.
 

Related Articles