राज्यात ‘नमो महारोजगार’ मेळाव्यांचे आयोजन   

२ लाख तरुणांना स्वयंरोजगार देणार

 
मुंबई, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या माध्यमातून दोन लाख तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 
यापूर्वी नागपूर येथे राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसुली विभागात एक या प्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी प्रति मेळावा पाच कोटी याप्रमाणे तीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी विविध विभागांवर जबाबदारी देण्यात आली असून उद्योजकांसह विविध घटकांना सहभागी करून घेण्यात येत आहे.
 

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना 

 
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल. याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल. यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेसाठी 480 कोटींच्या खर्चास काल मान्यता देण्यात आली. राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल.
 

Related Articles