’मधुमेह आणि लठ्ठपणापासून मुक्त जग’ मोहीम महत्त्वाची   

पुणे : आहाराचे काटेकोरपणे पालन केलेच शिवाय आपल्या जीवनशैलीमध्ये, सकारात्मक बदल केले आहेत. आज अनेकांना आपल्याला मधुमेह झाला आहे याचीही कल्पना नसते. यामुळेच ’मधुमेह आणि लठ्ठपणापासून मुक्त जग’ ही आम्ही सुरु केलेली मोहीम प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.
 
असोसिएशन फोर डायबेटीज अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या डायबेटीज केअर उपक्रम यांच्या वतीने आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी लिहिलेल्या ’डॉ. दीक्षित जीवनशैली: मधुमेह मुक्तीची गुरुकिल्ली’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ सुरेश शिंदे, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ जयंत नवरंगे, इन्फोसिस, पुणेचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, आदी यावेळी उपस्थित होते.    
 
याप्रसंगी डायबिटीज रिव्हर्सल काउंसिलिंग सेंटर, पुणेच्या सदस्यांसह देशात ज्या रुग्णांनी मधुमेह मुक्तीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करणार्‍यांचा गौरव करण्यात आला. यावेळी यातील प्रतिनिधींनी आपला मधुमेह मुक्तीचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. यामध्ये कराड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुहास देशपांडे, कल्याण येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास चौधरी आणि निवृत्त लष्करी अधिकारी विठ्ठल थोरात यांचा समावेश होता.
 
डॉ. सुरेश शिंदे यांनी लठ्ठपणा आणि मधुमेहाचा आपल्या समाजावर कसा परिणाम होत आहे यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आज आपण गरजेपेक्षा जास्त आणि दिवसातून अनेक वेळा खातो. यावर आपले नियंत्रण असेल, तरच अशा मधुमेहासारख्या आजारांना आळा घालण्या संदर्भातील मार्ग निघू शकेल. 
प्रवीण कुलकर्णी म्हणाले, एका अहवालाप्रमाणे आज 11- 12 कोटी भारतीय हे मधुमेहाने ग्रस्त आहेत त्यापैकी 16 कोटी नागरिक हे प्री-डायबेटिक आहेत आणि 10 पैकी 4 लोकांना लठ्ठपणा, रक्तदाब इत्यादींशी संबंधित इतर काही समस्या आहेत. दिवसेंदिवस, अगदी किशोरवयीन मुले आणि शाळेत जाणारे विद्यार्थी देखील प्री-डायबेटिक किंवा डायबेटिक होण्याचे प्रमाण वाढत आहे म्हणूनच एवढे मोठे आव्हान रोखण्यासाठी तात्काळ आणि आवश्यक ती सर्व पाऊले उचलली पाहिजेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोरे यांनी केले तर विश्वास जोशी यांनी आभार मानले.
 

Related Articles