मुठा नदीखालून मेट्रो धावली   

पुणे : पुणे महामेट्रोने सोमवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. मुठा नदीखालून मेट्रो स्वारगेट स्थानकापर्यंत धावली. मेट्रो लवकरच स्वारगेटपर्यंत सेवेत उपलब्ध होईल, असा विश्‍वास मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला.पुणे मेट्रोचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित मार्गाची कामे जोमाने सुरू आहेत. काही महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण होऊन प्रवाशांसाठी मेट्रो खुली करण्यात येईल. मेट्रोने शिवाजीनगर न्यायालय भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर काल चाचणी पूर्ण केली, असेही प्रशासनाने सांगितले. शिवाजीनगर न्यायालय भूमिगत स्थानक येथून काल सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी मेट्रोची चाचणी सुरु केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो 11 वा. 59 मिनिटांनी स्वारगेट भूमिगत स्थानक येथे पोहोचली. 
 
या चाचणीसाठी 1 तास वेळ लागला. मेट्रोचा वेग ताशी 7.5 किमी इतका ठेवण्यात आला होता. एकूण 3.64 किमी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.शिवाजीनगर न्यायालय ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो. पुणे मेट्रो प्रकल्पामधील भुयारी मार्गाचे खोदकाम 28 सप्टेंबर 2020 रोजी सुरु झाले. एकूण 12 किमी भुयारी मार्गाचे खोदकाम काम 4 जून 2022 रोजी पूर्ण झाले. कालच्या चाचणीमुळे शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गिकेचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे. हा मार्ग सुरु झाल्यानंतर पुणे शहरातील मध्यवर्ती भाग मेट्रो नेटवर्कला जोडला जाणार आहे. तसेच, जलद व सुरक्षित असा शहरी वाहतुकीचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होईल. रुबी हॉल क्लिनिक स्थानक ते रामवाडी स्थानक या उन्नत मार्गावरील केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होऊ होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
 

Related Articles