पुणे बुक फेस्टिव्हलच्या बिलाला पालिकेची मंजुरी   

पुणे : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टतर्फे पुण्यात आयोजित पुणे बुक फेस्टिव्हलसाठी 30 लाखांच्या बिलास महापालिकेच्या स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली आहे.केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टतर्फे पुण्यात 16 ते 24 डिसेंबर या कालावधित पुणे बुक फेस्टिव्हल झाला. लहान मुले, शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी महापालिकेला याचे सहप्रायोजकदेखील करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार एस. पी. कॉलेजच्या मैदानावर स्टोरी टेलिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. एस.पी. कॉलेजच्या मैदानावर या कार्यक्रमासाठी पाच हजार पालक, पाच हजार मुलांना बसण्याची व्यवस्था, मांडव, कापडी मास्किंग, स्वागत कमानी, खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच इतर खर्चदेखील करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुणे महापालिका सहआयोजक असल्याने या कार्यक्रमाच्या व्यवस्थेच्या खर्चाचे बिल देण्याचा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवला होता. त्यास सोमवारी मंजुरी देण्यात आली.
 
दरम्यान, पुणे बुक फेस्टिव्हलचे समन्वयक म्हणून राजेश पांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. पांडे हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकार्‍यांची मोठी लुडबुड होती. या कार्यक्रमास राज्य, तसेच केंद्रातील मंत्र्यांनी देखील हजेरी लावली. त्यामुळे हा कार्यक्रम भाजपने आयोजित केल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. तर, निधी नसतानादेखील महापालिकेने वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. याच काळात साजरा झालेल्या बालोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बिलासही सोमवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.
 

Related Articles