राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा १२ फेब्रुवारीला मोर्चा   

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेतर्फे शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी पुणे येथे शनिवार वाडा ते शिक्षण संचालक व शिक्षणायुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 20 फेब्रुवारीपासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांनी सांगितले.
 
शिक्षकेतरांच्या भरतीस त्वरित परवानगी मिळावी, शिक्षकेतरांना 12 वर्षे व 24 वर्षानंतर पहिला व दुसरा लाभ तत्काळ लागू करण्यात यावा, सेवेत असल्यास आपली शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्या सर्व प्रकारच्या पदावर वेतन संरक्षणासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा व पवित्र प्रणाली मधून वगळण्यात यावे, पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतरांना वेतन व वेतन श्रेणी संरक्षण मिळावे,  विनाअनुदानित तुकडी वरील विद्यार्थी संख्या शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरावे, यासह आदी प्रलंबित प्रश्नांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे येथे होणार्‍या मोर्चासाठी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य कोषाध्यक्ष सुखदेव कंद,  पुणे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे व पुणे जिल्हा शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रसन्न कोतुळकर यांनी केले आहे.
 

Related Articles