पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु   

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठीची अर्ज प्रक्रिया विद्यापीठाकडून सुरू करण्यात आली असून, अर्ज सादर करण्यासाठी 23 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
 
डॉ. प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. विजय खरे यांच्याकडे कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र या पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव विद्यापीठाकडून राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता या पदासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कुलसचिव हे विद्यापीठ प्रशासनातील महत्त्वाचे संविधानिक पद आहे. कुलसचिव हे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाचे प्रमुख असतात.
 
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, आता कुलसचिव पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवाराला कुलसचिव पदासाठी अर्ज करता येणार आहे. 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आणि किमान 15 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव यांसह अन्य अटींची पूर्तता उमेदवाराला करावी लागणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर मुलाखती घेऊन कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
 

Related Articles