सीईओ नियुक्तीवरून भारतीय ऑलिम्पिक संघटनेत दोन गट   

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये (आयओए) मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या (सीईओ) नियुक्तीवरून दोन गट पडले आहेत. दोन गटांपेक्षा अध्यक्षा पी.टी.उषा विरुद्ध सरचिटणीस कल्याण चौबे या दोघांमध्येच तेढ निर्माण झाली आहे. चौबे यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय फुटबॉल संघटनेचे सचिव शाजी प्रभाकरन यांची अशीच हकालपट्टी केली होती आणि त्यानंतर कार्यकारिणी घेऊन हा निर्णय मंजूर करून घेतला. त्याचप्रमाणे ‘आयओए’च्या ‘सीईओ’ची आधी हकालपट्टी करून मग चौबे यांनी 13 फेब्रुवारीस कार्यकारिणी बोलाविल्याची नोटीस काढली आहे. यामुळे हा वाद चांगलाच चर्चेत आला.
 
चौबे यांनी ‘सीईओ’ अय्यर यांच्या हकालपट्टीवर कार्यकारी परिषदेच्या बहुतांश सदस्यांनी स्वाक्षर्‍या केल्याचा दावा केला आहे. ‘आयओए’ने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वारंवार येणार्‍या कडक इशार्‍यांनंतर अखेर गेल्याच महिन्यात रघुराम अय्यर यांची ‘सीईओ’ म्हणून नियुक्ती केली होती. अय्यर इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाचे माजी अधिकारी होते. मात्र, कार्यकारिणी सदस्यांनी एका वरिष्ठ खेळाडूच्या दबावाखाली ही नियुक्ती झाल्याचा आरोप केला. नियुक्तीच्या बैठकीतच 12 सदस्यांचा अय्यर यांच्या नियुक्तीस विरोध होता असे म्हटले जात आहे.
 
या संदर्भात अध्यक्षा पी.टी. उषा यांनी हे सर्व कारस्थान लज्जास्पद आहे. मी काहीच चूक केलेले नाही, त्यामुळे मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. अय्यर चांगेल अधिकारी असून, ते यापुढेही काम करत राहतील यात शंका नाही, असेही पी.टी. उषा म्हणाल्या. क्रीडा पत्रकार महासंघाच्या वतीने उषा यांचा गौरव करण्यात आला. 
 

Related Articles