मंदिरामुळे उत्तम उत्पन्नवाढ   

वृत्तवेध

 
अयोध्येतील राम मंदिराचे पूर्णत्व आणि या निमित्ताने पर्यटन वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उचललेल्या पावलांमुळे आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये राज्याला 20 हजार ते 25 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई अपेक्षित आहे. स्टेट बँकेच्या संशोधकांच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. 
 
उत्तर प्रदेश सरकारच्या अंदाजपत्रकानुसार 2024 मध्ये त्याचा कर महसूल 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. संशोधकांच्या मते, 2022 च्या तुलनेत 2024 मध्ये उत्तर प्रदेशमधील पर्यटन खर्च दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाल्याने आणि उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन वाढवण्यासाठी उचललेल्या इतर पावलांमुळे या वर्षाच्या अखेरीस राज्यातील पर्यटकांचा खर्च चार लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचू शकतो. 2022 मध्ये देशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2.2 लाख कोटी रुपये, तर विदेशी पर्यटकांनी दहा हजार कोटी रुपये खर्च केले. 2022 मध्ये 32 कोटी देशी पर्यटक उत्तर प्रदेशमध्ये आले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोनशे टक्के अधिक आहे. 2022 मध्ये विक्रमी 2.21 कोटी पर्यटक अयोध्येत आले होते.
 
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेच्या अहवालात आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक मापदंडांवर उत्तर प्रदेशच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले आहे. यामध्ये महिला श्रमशक्तीचा वाटा वाढणे आणि नवकल्पना आणि निर्यातीतील वाढ यांचा समावेश आहे. 2028 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि उत्तर प्रदेशचा विकासदर पाचशे अब्ज डॉलरच्या पुढे जाईल, असे अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेशचा राज्य विकासदर 2024 च्या आर्थिक वर्षात 24.4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2028 पर्यंत उत्तर प्रदेश देशाच्या विकासदराच्या बाबतीत दुसर्‍या स्थानावर पोहोचेल आणि त्याचा विकासदर नॉर्वेच्या वर राहील.
 

Related Articles