स्वरलतेच्या मराठी गीतांचा खजिना बंगाली अभ्यासकामुळे वाचकांना खुला   

स्वप्निल पोरे
 
पुणे :  स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या स्वरांनी झपाटून गेलेले पश्‍चिम बंगालमधील जाणकार रसिक आणि अभ्यासक स्नेहाशिष चटर्जी यांनी लतादीदींच्या गीतांवर कोश सिद्ध करून हिमालयाएवढे काम उभे केले आहे. मराठीमध्ये लतादीदींनी गायलेल्या सर्व गीतांच्या कोशाचाही त्यात समावेश असून मराठीत आतापयर्र्ंत कोणीही करू न शकलेले काम एका बंगाली भाषकाने करून दाखविले! 
 
सर्वच भाषांमधील लतादीदी मंगेशकर यांच्या गीतांचा कोश करण्याचे ‘शिवधनुष्य’ स्नेहाशिष चटर्जी यांनी हाती घेतले. लतादीदींची मातृभाषा असलेल्या मराठीतील त्यांच्या गीतांचा कोश तयार करणे हा चटर्जी यांच्यासाठी आव्हानाचा आणि तेवढाच जिव्हाळ्याचाही विषय होता. जवळपास वीस वर्षे अथक परिश्रम करून त्यांनी हे काम पूर्ण केले. 
लतादीदींच्या कारकिर्दीची सुरुवातच मराठी गीतांपासून झाली होती, मात्र मराठी भाषेत त्यांच्या मराठी गीतांचा कोश नव्हता. तो व्हायला हवा, या भूमिकेतून कामाला सुरुवात केली, असे चटर्जी यांनी ‘केसरी’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, माहितीसाठी अनेकदा महिनो न् महिने प्रतीक्षा करावी लागली. देवनागरी आणि इंग्रजीत संपूर्ण गीत, गीतकार, संगीतकार, चित्रपट यांसह आवश्यक माहिती, असे कोशाचे स्वरूप आहे. मराठी चित्रपटातील गीते, भावगीते, कोकणीसह महाराष्ट्रातील अन्य बोली भाषांमधील त्यांच्या गीतांचा संपूर्ण तपशील यात नोंदला गेला आहे. 
 
त्यांच्या मराठीतील चित्रपट गीतांची संख्या 295 तर अन्य गीतांची संख्या 141 आहे. मुंबईतील बंगाली भाषक संग्राहक अमिय चक्रवर्ती यांनी मराठी गीतांच्या कोशासाठी अनेक दुर्मिळ बुकलेट्स् चटर्जी यांना पुरविली. विश्‍वास नेरुरकर, जयंत राळेरासकर, डॉ. मंदार बिच्चू, भालचंद्र मेहेर, गिरीधारीलाल विश्‍वकर्मा, दीपक चौधरी, सुरेश चांदवणकर अशा अनेकांची मदत मिळाली. गीताचे शब्द अचूक येतील यासाठी नाशिकचे डॉ. अभिजीत सराफ यांनी मेहनत घेतली. 
 
लतादीदी मंगेशकर यांच्या मराठी गीतांच्या कोशासह त्यांच्या गीतांचे तब्बल चौदा कोश स्नेहाशिष चटर्जी यांनी सिद्ध केले आहेत. त्यातील एक कोश लतादीदींच्या बंगाली गीतांचा आहे. हिंदी आणि मराठीनंतर त्यांची सर्वाधिक गाणी बंगाली भाषेतच आहेत.
 
लतादीदींच्या गीतांचा अभ्यास करणार्‍यांसाठी चटर्जी यांच्या कार्यामुळे महत्त्वाचा दस्तऐवज उपलब्ध झाल्याने संदर्भासाठी देखील हे काम महत्त्वाचे ठरले आहे. लतादीदींनी जगभरातील 38 भाषांमध्ये गाणी गायिली, त्यात 32 भारतीय आणि सहा परदेशी भाषांचा समावेश आहे, अशी माहिती यातून पुढे आली. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांची एकूण 5 हजार 524 आणि चित्रपटांबाहेर हिंदी भाषेतील 257 गीते आहेत. 
 
हिंदी, बंगाली, मराठी भाषांमध्ये लतादीदी मंगेशकर यांनी गायिलेल्या गीतांचा कोश पूर्णत्वास गेल्यावर उडिया, आसामी, पंजाबी, मल्याळम, कन्नड या अन्य प्रादेशिक भाषांमधील त्यांच्या सर्व गीतांचा कोश स्नेहाशिष चटर्जी तयार करत आहेत. हा पंधरावा कोश लता गीत कोश प्रकल्पातील शेवटचा असेल, असे चटर्जी यांनी सांगितले. याशिवाय ‘मेरी आवाज ही पहचान हैं’ या ग्रंथात चटर्जी यांनी लतादीदींनी 38 भाषांमध्ये गायिलेल्या सर्व 6 हजार 703 गीतांचा तपशील नोंदविला आहे. 
---
स्नेहाशिष चटर्जी हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरचे रहिवासी. शिक्षण विभागातून अलीकडेच ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर सध्या त्यांचे वास्तव्य कोलकात्याचे उपनगर डमडममध्ये आहे. संगीताचे शिक्षण देणारी त्यांची संस्था आहे. आपले दैवत लता मंगेशकर यांच्यावरून त्यांनी आपल्या संगीत शिक्षण संस्थेचे नाव ‘स्वर गंगा’ असे ठेवले. शालेय वयातच लतादीदी मंगेशकर यांच्या स्वरांनी त्यांच्यावर गारुड केले. मोठ्या गायकांनी नेमकी किती गीते गायिली, याबद्दलची गोंधळाची आकडेवारी पाहून चटर्जी यांनी 1982- 83 च्या सुमारास माहिती एकत्र करण्यास सुरवात केली. त्या वेळी संपर्काच्या साधनांना मर्यादा असतानाही चटर्जी यांनी काम नेटाने पुढे नेले. यासाठी त्यांनी पैसा आणि वेळ याचीही पर्वा केली नाही. या कामात त्यांच्या कुटुंबीयांचे कायम पाठबळ राहिले. आपल्या हातून झालेले काम लतादीदींचा आशीर्वाद आहे, ही चटर्जी यांची भावना आहे. लतादीदी मंगेशकर यांच्या ध्वनिमुद्रिकांचा मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. चित्रपट संगीताच्या प्रेमींना  latageetkosh2022@gmail.com यावर चटर्जी यांच्याशी संपर्क साधता येईल.

Related Articles