नवीन तंत्रज्ञान शिकले तरच ’जेन झी’चा टिकाव लागेल   

पुणे : मागील काही वर्षात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. भारत म्हणून आपण क्वांटम तंत्रज्ञानामध्ये काही प्रमाणात मागे आहोत. पण येत्या काळात या तंत्रज्ञानावर भर दिल्यास आपला वेगाने विकास होईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आंतरविद्याशाखीय अभ्यास होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे सल्लागार व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी केले.
 
पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये ‘डवान्सेस इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. नातू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अलिकॉन ग्रुपचे स्ट्रॅटेजिक बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख हर्षवर्धन गुणे, एज्युलॅब ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक केन यानागिनोउची, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक राजेंद्र कडूसकर, माजी अध्यक्ष व संचालक सुनील रेडेकर, इंजिनिअरींग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदिप पाटील व परिषदेचे संयोजक डॉ. रविंद्र एदलाबादकर व डॉ. मनमोहन भूमकर उपस्थित होते.
 
डॉ. अरविंद नातू म्हणाले, जनरेशन झीने नव्याने येणारे तंत्रज्ञान आत्मसात करायलाच हवे, नाहीतर त्यांचा टिकाव लागणे अवघड होईल. आता इंडस्ट्री 5.0 वेगाने विकसित होत असून, ती मानवकेंद्रित आहे. एआय आल्यामुळे अनेकांच्या नोकर्‍या जातील, कौटुंबिक आयुष्य खराब होईल असे बोलले जात होते. हे काही प्रमाणात खरे असले तरी आपण या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतले तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. 
 
राजेंद्र कडूसकर यांनी प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय परिषदेमागची भूमिका स्पष्ट केली. सुनील रेडेकर यांनी पुणे विद्यार्थी गृहाच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. संदिप पाटील यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत विस्ताराने माहिती दिली. परिषदेसाठी निवड झालेल्या 156 संशोधन प्रकल्पांच्या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. दुसर्‍या सत्रात हर्षवर्धन गुणे व केन यानागिनोउची यांनी उपस्थितांशी संवाद साधला. डॉ. मधुरा महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. मनमोहन भूमकर यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles