दाक्षिणात्य अभिनेत्री बी सरोजा देवी यांचे निधन   

बंगळुरू : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनय सरस्वती म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. ‘ससूराल’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटाच्या त्या नायिका होत्या. ‘ससूराल’‘स्कूल मास्टर’, ‘बेटी बेटे’, ‘ऑपेरा हाऊस’, ‘दूज का चाँद’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे हिंदी चित्रपट प्रेमींकडून त्यांची आठवण निघत असे. ७ जानेवारी १९३८ रोजी कर्नाटकातील बंगळुर येथे सरोजा देवी यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव भैरप्पा सरोजा देवी. १९५५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी ’महाकवी कालिदास’ या कन्नड चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ’पांडुरंग महात्म्य’ या चित्रपटातून त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले. १९५८ मध्ये आलेल्या ’नादोदी मन्नन’ या तामिळ भाषेतील क्लासिक सिनेमाने त्यांना देशभर प्रसिद्धी मिळवून दिली. या सिनेमात त्यांनी एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. नायिका म्हणून त्यांना या चित्रपटाने प्रचंड यश मिळवून दिले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
 
७० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी तामिळ, कन्नड, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये दोनशेहून अधिक चित्रपट केले. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने १९६९ मध्ये त्यांना पद्मश्री आणि १९९२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते. २००८ मध्ये त्यांना जीवनगौरव तसेच तामिळनाडू सरकारकडून दिला जाणारा मानाचा ’कलाइमामणी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. बंगळुरू विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टरेट देखील मिळाली होती.

Related Articles