मालदीवचे राष्ट्रपती मुइझ्झू यांच्याकडून भारतीय सैनिकांना परत जाण्याची विनंती   

नवी दिल्ली : मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी पदाची शपथ घेऊन 24 तास झाले नाहीत तोवर त्यांनी भारताबरोबर प्रतिकूल भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्यांना परत बोलवून घेण्याची औपचारिक विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. 
 
सत्तेत आल्यास भारतीय सैन्य परत पाठवू असे आश्‍वासन मुइझ्झू यांनी दिले होते. त्यानुसार ते आता नवी दिल्लीकडे यासंदर्भात मागणी करत आहेत. शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि मुइझ्झू यांची भेट झाली होती. यावेळी त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आल्याचे समोर येत आहे. राष्ट्रपतीपद संभाळल्यानंतर मुइझ्झू म्हणाले होते की, मालदीवमध्ये कोणतेही विदेशी सैन्य असणार नाही याबाबत आम्ही खात्री करू.
 

भू-राजकीय हॉटस्पॉट

 
कमी क्षेत्रफळ असलेल्या या देशात जवळपास 5 लाख लोक राहतात. पर्यटनासाठी हा देश प्रसिद्ध आहे. पण, या देशाचे हिंद महासागरातील स्थान भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंद महासागराचे आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त आहे. दुसरीकडे, आशियामध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित करू पाहणार्‍या भारत आणि चीन यांच्यामध्ये यावरून प्रतिस्पर्धा आहे. त्यामुळे मालदीव दोन्ही देशांसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे.दीर्घकालीन दृष्टीकान ठेवून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये मालदीवमध्ये विकासकार्य हाती घेतले आहे. मोठी गुंतवणूक केली आहे. मालदीवसारखा छोटा पण अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेला देश आपल्या बाजूने असणे नवी दिल्ली आणि बिजिंसाठी फायद्याचे ठरणार आहे.
 

मुइझ्झूचा चीनकडे कल

 
राष्ट्रपती मुइझ्झू हे इब्राहिम मोहम्मद यांना हरवून सत्तेत आले आहेत. माजी मंत्री आणि मालेचे महापौर राहिलेले मुइझ्झू हे माजी राष्ट्रपती अब्दु्ल्ला यामीन यांचे निकटवर्तीय आहेत. अब्दुल्ला यामीन यांनी 2013 ते 2018 या आपल्या कार्यकाळात चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. त्यांचेच शिष्य असलेले मुइझ्झू यांनी चीनसोबत घनिष्ठ मैत्रीचे वक्तव्य केली आहेत.
 

संतुलन राखण्याचा प्रयत्न

 
राष्ट्रपतीपदी निर्वाचित झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकांना परत पाठवण्याची तयारी केली आहे. तसेच, त्यांनी चिनी सैनिकांच्या तैनातीलाही विरोध केला आहे. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
 

मालदीवमध्ये भारतीय सैनिक

 
मालदीवमध्ये भारताचे फक्त 70 सैनिक आहेत. भारत पुरस्कृत रडार आणि विमानांच्या देखरेखीसाठी हे सैनिक तैनात आहेत. याठिकाणी तैनात असलेली भारतीय युद्धनौका स्पेशल इकॉनॉमिक भागात देखरेख करण्यासाठी मदतीची ठरते. मालदीवमध्ये अनेक मदत कार्यांमध्ये भारतीय सैनिकांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. भारतीय जवान याठिकाणी प्रामुख्याने पायलटचे काम करत असतात. भारतीय सैनिकांची एक तुकडी गेल्या अनेक वर्षांपासून मालदीवमध्ये तैनात आहे. मंत्रालयाने म्हटले की, भारतीय जवानांची द्विपसमूहात मानवीय मदत, आपत्ती मदतकार्य आणि बेकायदेशीर समुद्री घडामोडी यांचा सामना करण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे.
 

Related Articles