डाबर : खरेदी दीर्घकाळ मधुर चवीची   

भाग्यश्री पटवर्धन

 
वेगाने खपणार्‍या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात डाबर आघाडीची कंपनी आहे. नियामक यंत्रणांची मान्यता प्रक्रिया लक्षात घेता डाबरच्या पंखाखाली रेलिगेर येण्यास काही कालावधी लागणार आहे. दोन्ही कंपन्यांचे शेअर दीर्घ काळासाठी गुंतवणूक योग्य आहेत. मात्र सध्या डाबरचा विचार श्रेयस्कर ठरेल.
 
आज देशातील बहुतेक घरात ज्या कंपनीची उत्पादने वापरली किंवा चाखली गेली आहेत त्या डाबर समूहाच्या शेअरची चर्चा करू. त्याची कारणे अर्थातच गेले काही दिवस या कंपनीने रेलिगेरबाबत सुरू केलेली हालचाल, त्यातून उद्भवलेला पेच, कज्जे-खटले ही आहेत. याशिवाय गेल्या आठवड्यात कंपनी प्रवर्तक बर्मन कुटुंबातील दोन सदस्य देशभर गाजत असलेल्या महादेव अ‍ॅप गैरव्यवहार प्रकरणी मुंबईत दाखल झालेल्या पोलिस तक्रारीत झळकले.
 
या प्रकरणी चौकशी पूर्ण होण्यास बराच काळ लागेल. मात्र डाबर प्रवर्तक रेलिगेर ताब्यात घेऊ इच्छित असल्याने त्या प्रयत्नात अडथळा निर्माण करण्याच्या हेतूने महादेव अ‍ॅप प्रकरणात आमचे नाव घेण्यात आले, असे स्पष्टीकरण बर्मन यांनी केले आहे. याशिवाय आणखी एका बातमीमुळे कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या आठवड्यात हालचाल दिसून आली. अर्थात ती बातमी दिलासा देणारी ठरली. परदेशात चालू असलेल्या एका प्रकरणात सहयोगी कंपनीचे नाव खटल्यातून वगळण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. केसाची गुणवत्ता सुधारणार्‍या एका उत्पादनाबाबत हा खटला सुरू आहे. मात्र त्यात Dabur International Ltd आणि Dermoviva Skin Essentials Inc या दोन्ही कंपन्यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले आहे. ही बातमी येताच महादेव अ‍ॅप प्रकरणामुळे 505 रुपयापर्यंत घसरलेला डाबरचा शेअर 534 रुपयापर्यंत वधारला. डाबर ही कंपनी किती भक्कम पायावर उभी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. वेगाने खपणार्‍या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात ही एक आघाडीची आणि भागधारकांना उत्तम परतावा देणारी कंपनी आहे. आता कंपनीची ताज्या  तिमाहीत कामगिरी पहा. कंपनीचे उत्पन्न 3,320.74 कोटी रुपये आहे. गेल्या तिमाहीपेक्षा त्यात 6.78% वाढ झालेली आहे. निव्वळ नफा 515.05 कोटी रुपये म्हणजे 11 टक्के वाढला आहे. कंपनीचे उत्पादन प्रकल्प 20 देशांत आहेत आणि 100 देशांत विविध उत्पादने विकली जातात. आज बंगालची ही कंपनी एक लक्षात राहणारी नाममुद्रा म्हणून परिचित आहे. सध्या कंपनीचे प्रवर्तक वित्तसेवा क्षेत्रातील रेलिगेर कंपनी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. गेल्या पाच वर्षात बर्मन कुटुंबाने या कंपनीतील आपला हिस्सा हळूहळू वाढवत नेला आणि आता तो 27 टक्क्यांच्या घरात पोचला आहे. आता कंपनीने भाग खरेदीचा खुला प्रस्ताव  दिला आहे. रेलिगेर भागधारकांचा या खरेदीला पाठिंबा असल्याचे बर्मन यांनी विविध प्रसार माध्यमांना मुलाखत देताना सांगितले आहे. डाबरचा कमाल किमान भाव (52- wk high सह 610.75 52- wk low 503.65) आहे तर रेलिगेरचा कमाल किमान भाव (52- wk high सह 280.60 52-wk low 135.60) आहे.
 

सावध राहायला हवे

 
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, असे संतवचन परिचित आहे. व्यवहार उत्तम असेल, तर पैसा जोडता येतो आणि वाढतो हे ते सूत्र. आता हा व्यवहार कसा करायचा ही अनुभव आणि जाणून घेण्याची गोष्ट. मात्र त्यात फसवेगिरी, अव्यवहार्य परतावा देण्याचे आमिष, पंचांग आणि निफ्टीचे नाते, ‘चार्ट का बाप‘ असे काही घडत असेल, तर त्यापासून सावध राहायला हवे. समाज माध्यम जितके प्रभावी तितके त्याचे मोहजाल हे लक्षात आले नाही, तर आहे ते गमावण्याची वेळ येऊ शकते. वर दिलेल्या एका प्रकरणी संबंधित चार्टच्या प्रवर्तक व्यक्ती आणि कंपनी यांच्यावर सेबीने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बाजारातून झटपट पैसे मिळवून देण्याच्या अनेक क्लृप्त्या लोक लढवतात आणि त्याला सामान्य माणूस बळी पडतो.
 

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

 

Related Articles