कंपन्यांचे आर्थिक विश्‍लेषण   

नफा / तोटा पत्रकाशी संबंधित मानके / गुणोत्तरे

 
आजच्या लेखात आपण ज्या दोन गुणोत्तरांची ओळख करून घेणार आहोत, ती जगभरात सर्वात जास्त वापरली जाणारी व सगळ्याच गुंतवणूकदारांच्या जिव्हाळ्याची गुणोत्तरे आहेत. एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायचा विचार जेव्हा गुंतवणूकदाराच्या मनात येतो तेव्हा सर्व प्रथम ही गुणोत्तरे तपासली जातात.  
 

तर ही अत्यंत महत्त्वाची गुणोत्तरे खालीलप्रमाणे आहेत :-

 
Earnings Per Share (EPS) अर्थात प्रति शेअर कमाई: एखादी कंपनी वर्षभरात जो काही व्यवसाय करते त्याचे उद्दिष्ट अर्थातच नफा कमावणे हे असते. कंपनीचे समभागधारक हे त्यांच्याकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणात कंपनीचे मालक असतात व त्यामुळे कंपनी जो नफा कमावते त्यावर त्यांचा, या मालकीच्या प्रमाणात हक्क असतो. प्रत्येक समभागधारकाला आपल्या वाट्याला कंपनीच्या नफ्याचा किती हिस्सा आला हे वरील गुणोत्तर दर्शविते. याचे सूत्र खालीलप्रमाणे आहे:
करपश्चात नफा  - प्रेफरेन्स शेअरवरील लाभांश
वर्षभरातील समभागांची सरासरीसंख्या
उदा:
कंपनीचा कारपश्चात नफा  - रु 2,00,00,000
प्रेफरेन्स शेअरवरील लाभांश  - रु 7,50,000
कंपनी समभाग सरासरी संख्या - 22,00,000
प्रति शेअर कमाई = रु 2,00,00,000- रु 7,50,000
22,00,000
= रु 8.75
जर प्रत्येक समभाग हा रु. 10 किमतीचा असेल तर या गुणोत्तराचा अर्थ असा की, एका समभाग धारकाला रु 10 च्या गुंतवणुकीवर एका वर्षात रु. 8.75 एवढी कमाई झाली.
आत्तापर्यंत अभ्यासलेल्या सर्व गुणोत्तरांप्रमाणेच हे गुणोत्तर देखील तुलनात्मक रित्या वापरले जाते - म्हणजे, इतर कंपन्यांच्या गुणोत्तरांशी तुलना अथवा एकाच कंपनीच्या आधीच्या वर्षातील गणोत्तराशी तुलना करून मग निष्कर्ष काढले जातात.
 
Price to Earnings ratio (P/E): कुठलीही कंपनी ज्या किमतीला समभाग विकते त्या किमतीला अगदी क्वचित त्याचे व्यवहार होतात. सर्वसाधारणपणे नियमितपणे नफा कमावणार्‍या कंपन्यांची किंमत ही नेहमीच त्याच्या मूळ किंमती पेक्षा जास्त असते. कारण अर्थातच या कंपन्यांच्या शेअरला जास्त  मागणी असते. Price to Earnings ratio (P/E) या गुणोत्तरामुळे आपल्याला बाजारातली एखाद्या शेअरची किंमत किंमत जास्त / कमी / रास्त आहे हे समजण्यास मदत होते. याचे सूत्र असे आहे :
 

कंपनी शेअरची किंमत प्रति शेअर कमाई

 
वरील उदाहरणात जर त्या कमानीच्या शेअरची किंमत रु 87.50 असेल तर त्याचा P/E   हा 87.50 8.75 = 10 असेल. आता समजा इतर एका कंपनीची प्रति शेअर कमाई रु 8.75 इतकीच असेल पण किंमत रु 105 असेल तर त्याचा P/E 12 असेल. म्हणजेच त्या कंपनीचे समभाग, प्रथमदर्शनी, आधीच्या कंपनीपेक्षा महाग असतील, कारण त्यांना जास्त मागणी आहे.  ही लेखमाला इथे समाप्त होत आहे पुढील लेखमालेत आपण वेग वेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांचे विश्‍लेषण करताना कुठल्या विशिष्ट बाबी / गुणोत्तरे अभ्यासली पाहिजेत याचा परामर्श घेऊया.
 

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

 

Related Articles