आरक्षणाचा प्रश्न रस्त्यावर सुटणारा नाही : पृथ्वीराज चव्हाण   

बारामती (वार्ताहर) : आरक्षणाचा प्रश्न रस्त्यावर सुटणारा नाही, कोणी सोडवायचा प्रयत्न करत असेल, तर ते दुर्दैवी आहे. आरक्षणाबाबत माझे स्पष्ट  म्हणणे आहे की, सरकारने हा प्रश्न सोडवला पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 पूर्वी धनगर समाजाला कशाच्या आधारावर आश्वासन दिले होते, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले पाहिजे. इतरांच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितला आहे. इतर आरक्षणप्रश्नी त्यांनी आश्वासन दिले असेल, तर त्याचा आदर करून वेळ दिला पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
 
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजाने आंदोलन केले. तसेच बारामतीच्या प्रशासकीय भावना समोर धनगर समाजाचे गेले नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमकी लोकशाही कुठे चालली आहे, या प्रश्नावर बोलताना चव्हाण म्हणाले, यावर मी भाष्य करणार नाही. मात्र, आपल्या राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये. राजकीय पुढारी सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न  करीत असतील, तर ते निंदनीय आहे.आरक्षणाचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. मात्र सरकार गेल्यामुळे ते टिकवता आले नाही. माझी खात्री आहे की, आमचे  सरकार असते, तर आरक्षण टिकवले असते. सरकारला अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करून महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळ फेकली की काय हा प्रश्न आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.
 

Related Articles