मावळमध्ये संदीप वाघेरेंची एंट्री, श्रीरंग बारणेंची ‘हॅट्ट्रिक’ हुकणार?   

भीमराव पवार

 
पिंपरी : महायुतीच्या जागा वाटपात मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे या गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच पुन्हा मावळच्या मैदानात असण्याची शक्यता आहे. महायुतीकडून श्रीरंग बारणे उमेदवार असतील, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून पिंपरीगावातील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. त्यांनीही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण मावळ मतदारसंघात जोरदार फ्लेक्सबाजी सुरू केली आहे. त्यावरून संदीप वाघेरे हेच मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास मावळमध्ये शिवसेनेच्या दोन गटांतच म्हणजे श्रीरंग बारणे विरूद्ध संदीप वाघेरे असा सामना रंगण्याची राजकीय चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामध्ये आजच्या राजकीय परिस्थितीनुसार संदीप वाघेरे यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी निवडणुकीत प्रचंड घाम फोडला, तरी त्यांची हॅट्ट्रिक होणे अवघड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
 
आगामी लोकसभा निवडणूक चार-पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातही राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. हे दोन्ही मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याचे आहेत. मात्र शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. यातील शिंदे गट भाजपसोबत, तर ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पवार गटासोबत आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीत होणार्‍या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ आणि शिरूर मतदारसंघ महायुतीत आणि महाविकास आघाडीत कोणत्या राजकीय पक्षाच्या वाट्याला येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. अशातच मावळ मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाला मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीत अजित पवार गट लढविणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मावळ मतदारसंघ शिंदे गट लढवणार असेल, तर या गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच निवडणुकीत महायुतीचे तिसर्‍यांदा उमेदवार असण्याची शक्यता आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर खासदार बारणे यांनी शिंदे गटासोबत जाणे पसंत केले आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा महायुतीची उमेदवारी दिली जाईल, असे सध्या तरी दिसत आहे.
 

सलग तीनवेळा शिवसेनेचा विजय

 
मावळ मतदारसंघात सलग तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेने विजय मिळविलेला आहे. 2009 मध्ये शिवसेनेचे माजी दिवंगत खासदार गजानन बाबर, 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झालेले आहेत. तीनही वेळा भाजप आणि शिवसेनेची युती होती. या मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे. मात्र महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिला आहे. तीनही निवडणुकीत भाजपच्या राजकीय ताकदीचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला झाला आहे. किंबहुना हा शिवसेनेचा नव्हे, तर भाजपचा विजय असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. मावळ मतदारसंघात सलग तीनवेळा विजयी झालेल्या शिवसेनेची आता दोन शकले पडली आहेत. राज्याच्या राजकारणात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. या दोन्ही राजकीय पक्षांचा एक गट भाजपसोबत आणि एक गट काँग्रेससोबत गेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची राजकीय शक्ती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विभागली गेली आहे. मावळ मतदारसंघात सध्याच्या परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडी यांची समसमान राजकीय ताकद दिसत आहे.  त्यामुळे आगामी निवडणुकीत मावळमध्ये चौथ्यांदा शिवसेनेच्या कोणत्या गटाला यश मिळते, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.
 

महाविकास आघाडीची उमेदवार चाचपणी

 
शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे मावळ मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. तसेच राष्ट्रवादीतही दोन गट पडल्यामुळे भाजप आणि शिवसेनेला अनुकूल असलेली या मतदारसंघातील परिस्थिती आता प्रतिकूल बनली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच लक्षवेधी मते घेतली आहेत. राष्ट्रवादीचा शरद पवार गट शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाची भूमिकाही या मतदारसंघात प्रभावी ठरत आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाविकास आघाडीने मावळ मतदारसंघात तगडा उमेदवार देण्यासाठी राजकीय चाचपणी केली आहे. हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात येणार असले तरी ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही संयुक्तपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून एका नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे समजते. त्यासाठी पिंपरी-चिंचवडमधीलच अनेक नावांवर उद्धव ठाकरे गटांत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. काहींना मातोश्रीवर बोलावून घेत त्यांच्याशी खासदार संजय राऊत यांनी संवाद साधल्याचेही सांगितले जात आहे.
 

संदीप वाघेरे महाविकास आघाडीचे उमेदवार

 
पिंपरीगावातील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनाही लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे गटासोबत चर्चा केल्याचे शहराच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भेटीगाठी नंतरच संदीप वाघेरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण मावळ मतदारसंघात जोरदार फ्लेक्सबाजीला सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे गटासोबतच त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटालाही जवळ केल्याचे चित्र दिसत आहे. त्यावरून लोकसभा निवडणुकीत संदीप वाघेरे हे मावळ मतदारसंघातील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास आगामी निवडणुकीत महायुतीचे श्रीरंग बारणे विरूद्ध महाविकास आघाडीचे संदिप वाघेरे यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. वाघेरे विरूद्ध बारणे अशी लढत झाल्यास संदीप वाघेरे यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. वाघेरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून मावळ मतदारसंघात महायुतीला पर्यायाने श्रीरंग बारणे यांना विजय सोपा नसल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीला अजून चार-पाच महिने बाकी आहेत. या काळात राज्याच्या आणि शहराच्या राजकारणात अजून काय वेगळे चित्र निर्माण होते, त्यावर मावळ मतदारसंघातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
 

केवळ मोदी लाटेमुळेच दोन वेळा खासदार

 
शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मवाळ मतदारसंघात सलग दोन वेळा निवडून आलेले खासदार आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला. ते भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र दोन वेळा खासदार असूनही त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात पक्षबांधणी किंवा स्वतःच्या गटाची राजकीय बांधणी करता आलेली नाही. खासदार असूनही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांना आपले दोन अंकी नगरसेवकही निवडून आणता आलेले नाहीत. 
 
उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कृपादृष्टीमुळेच ते दोन वेळा खासदार होऊ शकले आहेत. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाले असले, तरी मतदारसंघाच्या राजकीय मैदानातील त्यांची परिस्थिती वेगळी आहे. कोणत्याच कार्यकर्त्याला राजकीय ताकद देत नाहीत, अशी त्यांची शहराच्या राजकारणातील प्रतिमा आहे. 
 
मोदी लाटेमुळे त्यांना दोन वेळा खासदार होता आले. आगामी निवडणुकीतही मोदी लाट असेलच असे चित्र नाही. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर जनतेत उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीची लाट असल्याचे सर्वच राजकारणी मान्य करतात. उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा खासदार करूनही श्रीरंग बारणे यांनी त्यांची साथ सोडल्याचा वेगळा संदेश मतदारांमध्ये गेलेला आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना आगामी निवडणूक सोपी नसल्याचे चित्र आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मावळमध्ये सलग तिसर्‍यांदा निवडून येऊन हॅट्ट्रिक करणे श्रीरंग बारणे यांच्यासाठी अवघड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
 

भाजप-अजित पवार गटाची साथ?

 
संदीप वाघेरे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. नगरसेवक असताना त्यांनी नेहमी पक्षापासून चार हात लांब राहणेच पसंत केले होते. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्याचा त्यांना आता आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याची दाट शक्यता आहे. ते मावळ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची त्यांना शंभर टक्के मदत होणार आहे. त्याचप्रमाणे भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचीही आतून संदीप वाघेरे यांना मदत मिळेल, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. भाजपचे अनेक माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्याबाबत मवाळ भूमिका ठेवून आहेत. तसेच अजित पवार गटाचेही अनेक माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांना उघडपणे मदत करण्याची दाट शक्यता आहे. मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संदीप वाघेरे मैदानात उतरल्यास त्यांना महायुतीतूनच रसद मिळू शकते. संदीप वाघेरे यांच्यासारखा सर्वपक्षीय राजकीय प्रतिमा असलेला अन्य दुसरा कोणताही उमेदवार शहरात नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे मावळमध्ये महाविकास आघाडीसाठी संदीप वाघेरे हेच योग्य उमेदवार ठरू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
 

Related Articles