विश्‍वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी पुण्यातील चौकाचौकात चाहत्यांची गर्दी   

पुणे : विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाल्यानंतर शहरातील रहदारी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण शहरातील विविध चौकात करण्यात येत असून, क्रिकेटप्रेमींचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
 
विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम लढत चुरशीची झाली. क्रिकेट सामन्याचा निकाल काय लागणार याची उत्सुकता चाहत्यांना होती मात्र हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत सहाव्यांदा विश्‍वचषक जिंकला. रविवार असल्याने अनेकांनी सकाळीच भाजीपाला, मटण, मासळी खरेदी केले. दुपारी बारानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली. अनेकांनी सहकुटुंब क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्याचा ठरविला.
 
सामिष खाद्यपदार्थ, पावभाजी तयार करण्याचा बेत अनेकांनी रचला. शहरातील प्रमुख चौकातील गणेश मंडळांनी क्रिकेट सामना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना उपलब्ध करुन दिली आहे. नारायण पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ भागातील मंडळांनी क्रिकेटप्रेमींसाठी चहापान, तसेच अल्पहाराची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. 
 
सामना जिंकल्यानंतर विजयी जल्लोष करण्यासाठी ध्वनीवर्धक लावण्यात आले.क्रिकेट सामना सुरू झाल्यानंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आरती करुन श्री गणरायाला विजयाचे साकडे घातले.
 
क्रिकेट सामना सुरू झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरात अघोषित संचारबंदी लागू झाल्याचे चित्र होते. दुपारनंतर वाहनांची वर्दळ कमी झाली. बाजारपेठेतील गर्दीही कमी झाली.
 

Related Articles