E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
अनियोजित महानगराचा शाप
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
स्मार्ट सिटी होताना : सुरेश कोडितकर
महानगर पुणे हे सुव्यवस्थित आणि सुचारू पद्धतीने काम करत आहे की नाही, हे आपण वाहनांच्या गतीमानतेवरून पडताळू शकतो. प्रवासाचा शीण नाही झाला, म्हणजे वाहतूक व्यवस्था चांगली आहे, असे मानायला हरकत नाही. वाहने सुरक्षित ठेवता येणे, गर्दी आणि कोंडी न होणे, प्रवासी वेळेची बचत होणे हे शहरांतर्गत लवचिकतेचे लक्षण आहे. शहरात अपघात झाल्यास अथवा दुर्घटना उद्भवल्यास आपत्ती निवारण पथक, पोलिस आणि वैद्यकीय सेवा यांची तत्पर सेवा प्राप्त होणे आवश्यक असते. आपल्या पुणे शहरात हे अरुंद रस्ते, गर्दी, कोंडी यामध्ये शक्य होईल का ?
सध्या दिवाळी सणाचे उत्साही वातावरण आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांनी रस्ते फुलून गेले आहेत. व्यापारी वर्ग खुश आहे. लक्ष्मी रस्ता नामकरणाचे 101 वर्षे पूर्ण करून धन्य झाला आहे. यानिमित्त व्यापार्यांनी रस्ता विद्युत रोषणाईने उजळवला. तथापि या सर्व उत्साही पर्वात मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी, गर्दी, धांदल, वाहन लावण्यास जागा नसणे, दूरवर पायपीट याचा ग्राहकांना त्रास. आणि स्थानिक नागरिकांना या कोंडीचा सामना करावा लागण्याचा त्रास. तसे पाहायला गेले तर गावठाण भागाला गजबज हा त्रास वर्षभर सोसावा लागतो. त्यामुळे पुण्यात मध्यवर्ती भागात राहणे हा शापच आहे, याबद्दल आता दुमत नाही. तथापि अशी परिस्थिती पुण्याच्या सर्व उपनगरात आणि संलग्न रस्त्यांवर सारख्याच फरकाने पाहायला मिळत आहे. मग बदल काय झाला? शहराची लोकसंख्या आणि व्यवसाय वाढणे हे ढोबळमानाने महानगर होणे आहे. तर मग शहर न थांबता, श्वास न कोंडता, वाहतूक खोळंबा न होता, स्वच्छता, सुरक्षितता, सेवा, सुलभता या दृष्टीने तत्पर असेल तर ते स्मार्ट होणे आहे. या निकषावर आपले पुणे शहर कुठे आहे?
विकेंद्रीत बाजार हे स्मार्ट पाऊल
दिवाळीच्या सुगंधी, सुवासिक, प्रसन्न, रुचकर, स्नेहमय वातावरणात बरसलेल्या अवकाळी पावसाच्या धारांनी सर्वांच्या उत्साह आणि आशांवर पाणी फेरले. सर्वांचीच त्रेधातिरपिट उडाली. रस्त्यांवरील सर्व प्रकारचे विक्रेते, दुकानातील आणि रस्त्यांवरील ग्राहक, वाहनचालक, नागरिक यांचे अतोनात हाल झाले. अचानक आलेल्या पावसाने आसरा आणि आडोसा शोधायचा कुठे ? नंतर वाहू लागलेल्या पाण्याच्या लोंढ्याने हालात भर पडली. लावलेली वाहने, धावणारी वाहने, चालणारे, रेंगाळेलेले लोक, ग्राहक, विक्रेते, इतर हजारो संबंधित लोक यांचे एकाचवेळी एकाच भागात एकत्र येणे हे अनेक अडचणी आणि धोक्यांना निमंत्रण देणारे ठरू शकते. सुरक्षिततेसाठी असणारे उपाय अशा वेळी तोकडे ठरू शकतात. तशी वेळ येऊ नये म्हणून बाजार सेवांचे सक्षम विकेंद्रीकरण करणे हे स्मार्ट पाऊल आहे. स्मार्ट शहरासाठी कृतीबध्द होत असताना आपण आपल्या सवयी, प्रघात, सोय, सुलभता आणि पूर्वग्रह तपासून त्यात काळनुरूप बदल करायला हवेत. तसे आपण करत नाही आणि पुणे शहर आपोआप स्मार्ट होण्याची अपेक्षा करतो. हा विरोधाभास नव्हे काय ?
लादलेले महा(नगर), सुविधांची वानवा ?
पुणे शहर महानगर होत गेले ते त्याबद्दल असलेल्या आकर्षणातून झालेल्या, होत असलेल्या स्थलांतरामुळे. लाखो लोक पुणे शहरात आले ते शिक्षणसाठी. तसेच रोजगार, नोकरीच्या शोधार्थ. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने पुणे शहराच्या परिघावरील गावगाडयांचा चेहरामोहरा बदलून टाकला. हा वेगवान बदल त्या परिसराला अद्याप झेपलेला नाही. पचलेला तर मुळीच नाही. पुणे शहरातसुध्दा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विस्तारले आहे. तथापि त्याचाविस्तार शहराला लाभदायक झाला नाही. करांच्या रूपाने फक्त महसूल मिळाला. माहिती तंत्रज्ञान आणि तत्सम क्षेत्रातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली आर्थिक मदत घेतली जात आहे. यापलिकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडून फार काही पुणे शहराला मिळालेले नाही. स्थलांतर शहराच्या विकासाला नेहमीचा लाभदायक ठरत नाही. कुशल, अकुशल, मजूर आणि विविध सेवा क्षेत्रातील कामकरी वर्ग आपल्या पोटापाण्यासाठी शहरात राबतो. मिळेल तिथे पथारी मांडतो, पसरतो किंवा झोपड्यांच्या समुहात वाढ करतो. पुणे शहराच्या उपनगरात जागा शिल्लक नसताना महानगर होण्याचा अनावश्यक ताण हा परिघावरील ग्रामीण भागाच्या मुळावर आला. ज्या कारणामुळे आज पुणे ग्रामीण भागात बदल घडले ते जर त्यांच्या विकासासाठी सर्वार्थाने पोषक ठरले नसतील तर मग स्मार्ट होण्याचा मार्ग प्रशस्त होत नाही.
स्मार्ट करण्यासाठी लोकसहभाग
आधी नमूद केल्याप्रमाणे शहर सुधारणांचे काम हे एकटयादुकट्याचे काम नव्हे. ही सर्वस्वी सामुहिक जबाबदारी आहे. भौतिक बदल हे शासन, प्रशासन आणि समाजाच्या एकत्रित प्रयत्नातून होत असतात. शासन धोरणे ठरवते आणि कायदे करते. प्रशासन ते राबविते आणि त्यांची अंमलबजावणी करते. तथापि यात प्रतिनिधी म्हणून औपचारिकता आणि प्रशासन म्हणून नोकरीचा भाग असतो. सेवा, तळमळ आणि आत्मियता हे जर फक्त नागरिकांच्या आचरण आणि कृतीतून शक्य झाले तर बदल घडून येतात. दुर्दैवाने याची उणीव जीवनाच्या सर्व क्षेत्रात दिसून येते. आज दुर्दैवाने दहीहंडी, ढोल ताशा, दांडिया, प्रचार यासाठी एकत्र येणारा समाज शहर स्मार्ट करण्याच्या मुद्द्यावर एकवटत नाही. ही न केवळ खंत आहे पण खेद ही आहे.
नदी सुधार? फक्त माती दगड भराव
पुणे शहराच्या सीमांवर डोंगरभागात मुळा आणि मुठा नद्या उगम पावतात, पुण्यात त्यांचा संगम होतो. अशाच प्रकारे भामा ते भीमा अशा अनेक नद्या महानगर कार्यक्षेत्रातून वाहतात. त्यांच्या दुरवस्थेबद्दल काय बोलावे आणि काय लिहावे ? नदया आता वाळूसाठी ओरबाडल्या जातात. सुधारणेच्या नावाखाली माती आणि दगडी भरावाने बंदिस्त केल्या जातात. संगमवाडी ते मुंढवा या टापूत मुळा मुठेच्या काठावर नदी सुधार प्रकल्पाचे काम चालू आहे. मुळात हा नदी आणि तिचे आरोग्य सुधारण्याचा काडीमात्र प्रकल्प नसून हा फक्त नदीच्या उपलब्ध काठावर सुशोभीकरण करण्याचा उद्योग आहे. काही ठिकाणी नदीपात्रात दोन्हीकडे भराव घालून त्यावर दगडांचे अस्तरीकरणाव्दारे त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. जे नदीपात्र आजपर्यंत सुरक्षित होते ते सुध्दा आता मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेले नाही. ज्या नदीच्या काठावर सुशोभिकरण करून ते पर्यटन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय ती नदी आज मरणासन्न अवस्थेत गटार झाली आहे याचे कोणाला दुःखं नाही. येरवडा पुलावरून नदीपात्रात खाली कोरेगाव पार्क काठावर नदी सुधारचे काम पाहण्यास येणार्या अति महत्वाच्या लोकांसाठी शामियाने उभारले जातात आणि सुरक्षारक्षक नेमले जातात. पण नदीपात्रात घटाचे निर्माल्या टाकू यासाठी प्रबोधन करण्यासाठी कोणाची नेमणूक केली जात नाही. निर्माल्य नदीत टाकण्यापासून रोखण्यासकाहीच काम केले जात नाही. नदी मृत झाली असताना नदी सुधार प्रकल्प हा निरर्थक, निरुपयोगी आणि निष्कारण आहे. नदीचे पुनरुज्जिवन करण्यात कोणाला रस नाही.
उगम, झरे परिसंस्था जागृत करूया
नदी सुधार प्रकल्प म्हणजे नदीचे उगमस्थान शोधणे. ते खुले करून त्यातीलप्रवाह मोकळे करणे. पाटातील केरकचरा काढणे. नदीचे मूळ ते नदी धरणात विलीन होणे या संपूर्ण मार्गात नदी ही नैसर्गिक वाटली पाहिजे. ती गटार वाटताकामा नय दुर्दैवाने माता म्हणून आपण नदीचा गौरव करतो मात्र तिच्या दुरवस्थेला दूर करण्यासाठी काही करत नाही. मुळा आणि मुठा जिथून उगम पावतात, आणि वाहत पुणे शहरात येतात त्या संपूर्ण पट्ट्यात नदीत जर टाकाऊपाणी आणि इतर कचरा टाकला नाही तरच नदीचे आरोग्य सुधारायला मदत होईल. नदीच्या संपूर्ण मार्गात नैसर्गिक प्रवाह, झरे असू शकतात. तथापि गटार झालेली मुळामुठा ही गाळाने भरलेली आहे. घन कचरा किती असेल याची तर कल्पना करवत नाही. नदीच्या पाण्याला स्पर्श करण्याचे धाडस कोणी करणार नाही, इतकी नदीच्या पाण्याची गुणवत्ता खराब झालेली आहे. नदीचे पाणी निर्मळ करण्यासाठी खोलवरील नैसर्गिक झरे खुले करणे, नदीत बाहेरील काही येणार नाही याची काळजी घेणे, दुर्गंधी नष्ट करणे, जलपर्णी आणि डास तसेच घातक जिवाणू/विषाणू निर्माण होणार नाही यासाठी नदीत सांडपाणी येणार नाही वा नदीचे पाणी थांबून डबके होणार नाही, याची काळजी घेणे हे सारे नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नपूर्वक व्हायला हवे. दुर्दैवाने ते सोडून बाकी सगळे होत आहे. अशाने नदी सुधारणार कशी ?
स्मार्ट करणे पंचमहाभूतांनी शक्य ?
पुणे शहराच्या नैसर्गिक आच्छादन क्षेत्राला जसे की हरीत, पवन, मेघ, प्रकाश यांना आणि भूवरील मृदा आणि भूपृष्ठाखालील भूस्तर आणि भूजलाला जपायला हवे हे आपल्याला कळणार केव्हा ? आपण पर्यावरण र्हासाच्या कडयावर पोहचलो आहोत. देशाच्या प्रशासकीय आणि आर्थिक राजधानीच्या दिल्ली आणि मुंबई या शहरांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. लोक श्वास घुसमटत आणि फुप्फुसे कोंडलेल्या अवस्थेत जगत आहेत. जुन्या आणि महत्पूर्ण अशा या महानगरांवर काय ही वेळ ओढवली आहे ? पुण्यावर सुध्दा अशी आपदा ओढवू शकते. आपण अद्याप गाफील आहोत. महानगर होण्याचे दुष्परिणाम दुरून न्याहळत आहोत. दुरून डोंगर साजरे म्हणत आहोत. पण त्या परिणामांना रोखण्याचे, कमी वा निष्प्रभ करण्याचे कोणतेही प्रयत्न वा उपाय आपल्याकडे नाहीत. मग आपण पुणे स्मार्ट करायच्या वल्गना का करत आहोत ? शहर आकार घेते. ते बाळसं धरते. वाढते. विकसित होते. सुधारते. फैलावते. पण या सगळ्यात त्याचे जगणे सुखकर असते. ते मंद झुळूक आणि स्वच्छंद जल प्रवाह घेऊन पुढे जाते. ज्याक्षणी यात अनावश्यक, अतिरिक्त, अनैसर्गिक हस्तक्षेप होतो त्याक्षणी याची बजबजपुरी होते. डोंगर, दर्या, टेकड्या, खाणी, वनराई, देवराई, तलाव, डोह, झरे सारेच जगले पाहिजेत. पशु पक्ष्यांचा अधिवास राखला पाहिजे. पंच महाभूते आणि सृष्टी यांचे अनोखे नाते आहे. ते वगळून स्मार्ट होण्याचा हव्यास तो टाळायला हवा.
शाप लाभला, उःशाप मिळवूयात !
आज आपण महानगर पुण्यात महानगर होण्याचा शाप कोंडी, लोंढे, गुदमरणे, आरोग्याचा खेळ खंडोबा, महागाई, गुन्हेगारी, सांस्कृतिक आक्रमण, भेसळ आणि प्रदूषण या रूपाने भोगत आहोत. या शापावर उःशाप आहे. शापाला जबाबदार कोण ? या भांडणात वेळ दवडणे चुकीचे आहे. आणि उःशाप आपल्या सामुहिक प्रयत्नातून साकार होणार आहे. मर्जी आपली. कारण पुणे शहर आपले आहे. आपण या शहरात जन्मलो आणि शहराच्या अंगाखांदयावर वाढलो. या पुणे शहराने आपल्याला भरभरून दिले आहे. आता या पुणे शहराच्या आरोग्याची काळजी वाहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तोच उःशाप आहे. तुम्ही, आम्ही आपण सगळेच या पुणे शहर नैसर्गिक आणि मुलभूत पद्धतीने सुंदर, सुशोभित करण्याच्या वारीत सामील होऊया. पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या सर्व स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन याबाबत विचारमंथन करून एक कृती कार्यक्रम आखण्याची नितांत गरज आहे.
Related
Articles
थोपटे कुटुंबीयांवरील टीकेचे तीव्र पडसाद
08 Oct 2024
तक्रारींच्या निवारणाबाबत पालिका खातरजमा करणार
04 Oct 2024
वाचक लिहितात
09 Oct 2024
हिम्मत असेल, तर अपक्ष लढा
08 Oct 2024
इस्रायलचा बैरूतवर हवाई हल्ला; ९ ठार
04 Oct 2024
जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न : राहुल
07 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)