लोकमान्य टिळक आणि राष्ट्रीय शिक्षण   

स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड
 
लोकमान्य टिळकांचे उद्दिष्ट व ध्येय हे फक्त स्वराज्यप्राप्ती पुरते मर्यादित नव्हते.जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात अत्युत्तम कर्तव्य गाजवू शकते याचे चित्तथरारक उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक. राजकारण धुरंधर, खंदे पत्रकार, द्रष्टे संपादक आणि आदर्श शिक्षक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या सहकार्‍यांबरोबर मिळून 01जानेवारी1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि त्यांच्या सामाजिक कार्याची एक शिक्षक म्हणून सुरवात झाली. राष्ट्रीय शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी आपल्या अभ्यासक्रमाच्या शाळा असाव्यात आणि हेच शिक्षण सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी ’केसरी/मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली.
 
खेड्यांमध्ये प्राथमिक शाळा वाढवणे, गरीब मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत देणे अशा मागण्यांचा प्रस्ताव त्यांनी 1891च्या मुंबई प्रांतिक सभेच्या चौथ्या अधिवेशनात मांडला. डेक्कन कॉलेजच्या काळात टिळक-आगरकरांच्या मनात असा विचार आला की कमीत कमी खर्चात देशपोषक शिक्षण देणारी शाळा असावी. इथेच त्यांची खर्‍या अर्थाने विचारांची, वाचनाची व राष्ट्रकल्याणाची बैठक जमली व त्यातूनच ब्रिटिशांनी नेमून दिलेला शिक्षणक्रम कसा आहे याची त्यांना पूर्ण जाणीव झाली. ब्रिटिशांच्या शिक्षणातून राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा लढा उभा राहणार नाही आणि विद्यार्थी राष्ट्रभक्त सुद्धा घडणार नाहीत हे त्यांनी ओळखले व शिक्षणाला वेगळे वळण देण्याचे निश्चित केले. जनजागृतीसाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे हे लोकमान्य टिळकांनी ओळखले होते. तत्कालीन सरकारी शाळा म्हणजे सरकारी हमालखाने आहेत असे ते म्हणत. दुर्बलांना सबल करणे, असमर्थ जनतेला सामर्थ्यवान करणे आणि गरीब जनतेला सधन करायचे असेल तर राष्ट्रीय शिक्षण गरजेचे आहे असे ते प्रतिपादन करीत. देश व समाजाच्या समस्यांचा सर्वांगीण व वस्तुनिष्ठ अभ्यास करून त्यावर उपाय सुचविणारे शिक्षण म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण असे ते म्हणत. 
 
न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एजुकेशन सोसायटी या संस्थेमुळे राष्ट्रीय शिक्षणाची एक ऐतिहासिक परंपरा पुण्यात उभी राहिली. राष्ट्रीय शिक्षण कसे असावे हे सांगताना ते म्हणतात - ’ग्रामदेवतेची मंदिरे बांधली त्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण देणार्‍या शाळा व महाविद्यालये उभी राहिली पाहिजेत. आधुनिक पाश्चिमात्य ज्ञानाकडे पाठ न फिरवता, देशी व परदेशी शिक्षणाचा समन्वय साधायला हवा. ही नवीन शिक्षण प्रणाली अशी हवी जी आदर्श शिक्षण संस्था असेल. ह्या शिक्षणात राष्ट्राच्या उन्नतीचे व लोक जागृतीचे महत्त्वाचे साधन असावे’.
 

Related Articles