वाचक लिहितात   

भारतविरोधाची भूमिका बदलेल का?

 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना बहुधा लष्कर चुचकारते आहे. तथापि तीनदा पंतप्रधान राहिलेल्या नवाझ शरीफ यांना एकदाही आपला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे अंक नवा कथा तीच, असा हा प्रकार आहे. कारण लष्कराच्या इच्छेवर पाकमधील सरकार तरते आणि गुंडाळले देखील जाते. याच लष्कराच्या जीवावर पाकिस्तानचे पंतप्रधानपद उपभोगलेले माजी क्रिकेटपटू इम्रान खान लष्कराशी पंगा घेतल्यामुळे आज तुरुंगाची हवा खात आहेत. नवाझ शरीफ यांची पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली, तरी यातून पाकिस्तानच्या राजकीय, आर्थिक विपन्नावस्थेत व भारताबाबतच्या भूमिकेत काही फरक पडणार आहे का? वास्तविक आपल्या शेजारी राष्ट्रात, पाकिस्तानात लोकशाही रूजणे आणि वाढणे हे त्या देशाइतकेच भारताच्याही दूरगामी हिताचे आहे.  पाकिस्तानची आज कडेलोट अवस्था झाली आहे ती सत्तेस धर्माचे अधिष्ठान असताना. धर्माच्या अतिरेकी हस्तक्षेपाने या देशास कडेलोटापर्यंत आणले असून, आता त्यास वाचवण्याची ताकद ना धर्मवांद्यांत आहे ना राजकीय नेत्यांमध्ये. पाकिस्तानात निवडणुका होत असल्या तरी लोकशाही नांदण्याची कोणतीही हमी या निवडणूक प्रक्रियेतून दिली जात नाही. 
 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

 

वाढते रेल्वे अपघात चिंताजनक

 
सध्या रेल्वे अपघातांची मालिकाच सुरू आहे. रेल्वे मंत्रालयानेच दिलेल्या माहितीत 2022-23 या आर्थिक वर्षात रेल्वेचे 48 अपघात झाले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. जर एकाच वर्षात इतके अपघात होत असतील, तर  रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच. दोन रेल्वेची समोरासमोर टक्कर, रेल्वे डब्यांना आग लागणे, रेल्वे रुळांना तडे जाणे, चालकाने सिग्नल तोडणे, गाड्यांचा अति वेग आदी कारणांनी रेल्वे अपघात होतात, असे खुद्द रेल्वे खात्यानेच मान्य केले आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर या अपघातांची कारणे रेल्वे खात्याला माहीत आहेत, तर त्यावर उपाय का केला जात नाही. गेल्या 75 वर्षात रेल्वे प्रवाशांची संख्या कैक पटीने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत  सेवेत सुधारणा झाली नाही आणि आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली नाही. अपुरी सुविधाव्यवस्था, जुनीच  कालबाह्य ठरलेली यंत्रणा, पुरेशा कर्मचार्‍यांची वानवा, आहे त्या कर्मचार्‍यांवर असलेला कामाचा ताण, भ्रष्टाचार, सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष आदी बाबींवर रेल्वे खात्याने लक्ष द्यायला हवे. 
 

श्याम ठाणेदार, पुणे

 

सायमन ओडोनेलचा जळफळाट

 
विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत खेळला गेलेला पहिला उपांत्य फेरीचा सामना अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा झाला. भारतीय संघाने 397 धावांचा डोंगर उभा करून सामना जिंकला असला, तरी न्यूझीलंडच्या चिवट संघाने शेवटपर्यंत किल्ला लढवत भारतीय संघाच्या नाकी दम आणला होता. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतले 50वे शतक झळकावले आणि सर्वाधिक शतके ठोकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र या विक्रमी खेळीदरम्यान कोहलीच्या पायात गोळे येत होते आणि वेदनेने तो कळवळत होता. त्याने हातातली बॅटही फेकली. अशावेळी खिलाडूवृत्तीसाठी ओळखल्या जाणार्‍या न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी माणुसकीच्या दृष्टीने कोहलीला मदत केली. नेमकी हीच गोष्ट ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज सायमन ओडोनेल याला खटकली. सायमन म्हणाला की, तो तुमची गोलंदाजी फोडून काढतोय आणि तुम्ही त्याला मदत का करताय? तुम्ही त्याला त्याची बॅटही उचलून द्यायला नको होती. तुम्ही विराट कोहलीच्या जवळ न जाता 20 मीटर अंतर ठेवायला हवे होते. विराट कोहलीची विक्रमी खेळी व भारताच्या विजयाने सायमन ओडोनेलचा चांगलाच जळफळाट झालेला दिसतो.
 

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

 

सामाजिक सलोखा व सामंजस्य राखा

 
महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नती व विकासासाठी आरक्षण हवे ही मागणी योग्य आहे, संपूर्ण महाराष्ट्र या मागणीसाठी आपल्याशी सहमत आहे, या साठी भावनात्मक व अविवेकशील होऊन आपण आपल्या मनावरील आपले नियंत्रण गमावू नका, कुणाच्याही अफवांना बळी पडू नका, सरकारी कार्यालये जाळणे, बसेस जाळणे, रस्त्यावर टायर जाळणे, रस्ते अडविणे, हा या आरक्षण आंदोलनाचा भाग असू शकत नाही, हे जे नुकसान होत आहे, हे आपलेच नुकसान आहे, रस्ता अडविल्याने रुग्णाच्या रुग्णवाहिका थांबत आहेत, रुग्णांना जीव गमवावा लागत आहे, अत्यावश्यक वस्तू वेळेवर पोहचत नाहीत याचा विचार व्हावा. एसटी सेवा ठप्प झाली, याची आर्थिक झळ याचा फटका आपल्याला बसणार आहे, अशा प्रकारच्या आंदोलनात काही  विघ्नसंतोषी घुसले, तर त्यांना वेळीच बाजूला करा. त्यांच्यामुळेही गालबोट लागत असेल, तर त्यांना तात्काळ ओळखा. काही तरुण भावनेच्या आहारी जाऊन आपली जीवन यात्रा संपवित आहेत. अशांचे कुटुंब निर्वासित होत आहेत. आज अशा कुटुंबाला थोडी सहानुभूती मिळेल. परंतु, नंतर या कुटुंबाचे हाल होतील. त्याला कोणीही मदत करणार नाही,  याचा विचार व्हावा. एकदम टोकाची भूमिका ही कुटुंबाला, समाजाला, राज्याला घातक व विघातक ठरू पाहत आहे. सर्वांनीच सामाजिक सलोखा राखावा, अति भावनाशील होऊ नये.
 

धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद

 

Related Articles