उत्तर गाझामधील शाळेवर हल्ला   

तेल अवीव : उत्तर गाझामध्ये संयुक्त राष्ट्राद्वारे चालविण्यात येणार्‍या शाळेवर हल्ला करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राकडून याबाबत पुष्टी करण्यात आली असून, ही एक भयानक घटना असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
  मिळालेल्या माहितीनुसार, जबल्यातील अल-फखौरा शाळेचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मजली इमारतीच्या खोल्यांमध्ये रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले दिसत आहेत.
 
   मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीचे (यूएनआरडब्ल्यूए) प्रवक्ते ज्युलिएट टॉमा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, यामध्ये मृतांची एकूण संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
 
   यूएनआरडब्ल्यूए पॅलेस्टिनी निर्वासित भागांमध्ये शाळा चालवते. ही गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांची मुख्य मदत एजन्सी म्हणून काम करते. ही घटना कशामुळे घडली किंवा याला कोण जबाबदार आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यूएनआरडब्ल्यूएचे प्रमुख फिलिप लाझारिनी यांनी सांगितले की, या घटनेच्या वेळी हजारो विस्थापित नागरिक तेथे आश्रय घेत होते.  इस्रायली सैन्य या घटनेचा आढावा घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इस्रायलला धरले जबाबदार 
इजिप्त आणि कतारने यापूर्वीच या घटनेसाठी इस्त्रायलच्या लष्करी कारवाईला  जबाबदार धरले आहे. इजिप्शियन परराष्ट्र मंत्रालयाने याला बॉम्बस्फोट म्हटले आणि गाझामधील नागरिकांविरूद्ध इस्रायली उल्लंघनाच्या मालिकेतील हा आणखी एक हल्ला असल्याचे म्हटले आहे.
कतारने स्वतंत्र संयुक्त राष्ट्राच्या पथकास गाझाला जाऊन याचा तपास करावा असे सांगितले आहे. उत्तर गाझामधील यूएनआरडब्ल्यूएच्या शाळेवर हल्ला झाल्याची ही घटना 24 तासांतील दुसरी घटना असल्याचे असे एजन्सीने म्हटले आहे. 

 

Related Articles