अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नीला दिल्ली पोलिसांकडून समन्स   

८१ कोटींच्या कथितगैरव्यवहार प्रकरणी अडचणींत वाढ
 
दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘भारत पे’चे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन यांना समन्स जारी केला आहे. फिनटेक युनिकॉर्नमध्ये ८१ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांनी २१ नोव्हेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) मंदिर मार्ग कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, असा समन्स ईओडब्ल्यूने पाठवला आहे.
 
अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन हे गुरुवारी सुट्टी साजरी करण्यासाठी न्यूयॉर्कला जात होते. त्यावेळी त्यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले. यानंतर EOW अधिकार्‍यांनी समन्सची पुष्टी करताना ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, संबंधित दोघांविरोधात लूकआउट नोटीस जारी केल्यानंतर त्यांना दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले. EOW ने मे महिन्यात ग्रोवर, माधुरी जैन आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्या विरोधात ८१ कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात एफआयआर दाखल केला होता.
 
अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबाने कंपनीत लोकांच्या बोगस नियुक्त्या दाखवून, बनावट पावत्या दाखवून कंपनीची ८१.३ कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप ‘भारत पे’ कंपनीने केला आहे. ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबरला न्यायालयात 'स्टेटस रिपोर्ट' दाखल केला. दोषी आढळल्यास आरोपीला १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
 
डिसेंबर २०२२ मध्ये ‘भारत पे’ने ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी खटलाही दाखल केला होता. ज्यामध्ये कथित फसवणूक आणि निधीचा अपहार केल्याप्रकरणी ८८.६७ कोटी रुपयांपर्यंत नुकसान भरपाई करावी, अशी मागणी ‘भारत पे’ने केली होती.
 

Related Articles