महिलांना दरमहा अडीच हजार; 200 युनिट वीज मोफत   

तेलंगणात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध 

 
हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यामध्ये महिलांना दरमहा 2500 रुपये, गॅस सिलिंडर 500 रुपयाला तसेच 200 युनिट मोफत वीज अशा घोषणांचा समावेश आहे.खर्गे यांनी तेलंगणात ’अभय हस्तम‘ हा 42 पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
 
त्यानंतर खर्गे म्हणाले, राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास ’रायतू भरोसा’ योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना दरवर्षी 15,000 रुपयांची गुंतवणूक मदत, तर शेतात काम करणार्‍या मजुरांना 12,000 रुपये दिले जातील. चेयुता अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना  4,000 सामाजिक पेन्शन आणि 10 लाखांचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल.
 
आम्ही तेलंगणाला दिलेल्या सर्व हमींची अंमलबजावणी करू. जाहिरनामा आमच्यासाठी गीता, कुराण किंवा बायबल सारखा आहे. पहिल्या कॅबिनेट बैठकीत अंमलबजावणीसाठी या सर्व हमी मंजूर केल्या जातील. आम्ही कर्नाटकात काही आश्‍वासने दिली होती, ती आता लागू केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मिळून कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस नक्कीच सत्तेवर येईल. काँग्रेस पक्ष तेलंगणातील लोकांच्या प्रगतीसाठी, त्यांना सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरण देण्यासाठी कटिबद्ध आहे.आमच्या सहा हमी योजना तेलंगणाचे स्वप्न साकार करण्यास मदत करतील, असेही ते म्हणाले.
 

Related Articles