चामुंडेश्वरीलाही मिळणार ’गृहलक्ष्मी’ योजनेचा लाभ   

बंगळुरू : म्हैसूरच्या प्रसिद्ध चामुंडेश्वरी देवीचा ही कर्नाटक सरकारच्या ’गृहलक्ष्मी’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबातील महिलांना 2,000 रुपये देण्यात येतात.
 
काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आणि पक्षाच्या राज्य मीडिया सेलचे उपाध्यक्ष दिनेश गुलीगौडा यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र लिहून या योजनेंतर्गत दरमहा देवी चामुंडेश्वरीला दोन हजार रुपये द्यावेत, अशी विनंती केली होती. शिवकुमार यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना दरमहा दोन हजार रूपये चामुंडेश्वरी मंदिराच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले.
 
उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या विनंती पत्राला ताबडतोब प्रतिसाद दिला. कर्नाटक सरकारने 30 ऑगस्ट रोजी म्हैसूर येथून देवी चामुंडेश्वरी मंदिरात पहिला हप्ता जमा करून गृहलक्ष्मी योजना सुरू केली होती. ते देवीला अर्पण करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी योजनेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना केली होती. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करणे हा आहे.
 

Related Articles