ललित पाटील आणि साथीदारांना पुण्यातही सुरू करायचा होता अमली पदार्थांचा कारखाना   

पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणी ललित पाटीलसह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. याच अटक करण्यात आलेल्या आरोपींना नाशिकप्रमाणेच पुण्यातही अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरू करायचा होता. मात्र, त्यांचे सर्व रॅकेट उघडकीस आल्यामुळे त्याचा डाव फसल्याची माहिती पोलिस तपासामध्ये समोर आली आहे.
 
आरोपी इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला येथून तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला भोईसर येथून बुधवारी (15 नोव्हेंबर) पुणे पोलिसांनी अटक केली. या दोघांसह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींना बुधवारी मोक्का न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी ही माहिती न्यायालयास दिली. आरोपींना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
पंत याचा नाशिक येथील एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ललित पाटील आणि टोळीप्रमुख अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून तो हे काम करीत होता. तर इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला आरोपींनी मुंबईत मेफेड्रोनची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
लोहारे याने रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्याने पेट्रोल अमली पदार्थ तयार करण्याचे सूत्र व प्रशिक्षण टोळीतील इतर सदस्यांना दिले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती नाशिक नगर, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पसरली असल्याचे दिसते. या शिवाय राज्याबाहेर या टोळीने अमली पदार्थांची विक्री केली आहे. गुन्ह्याची व्याप्ती व क्लिष्टता लक्षात घेता आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी वकील साळवी यांनी केली.
 
दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंदकुमार लोहारे आणि प्रज्ञा कांबळे यांना पोलिसांनी येरवडा कारागृहातून तसेच रेहान ऊर्फ गोलू याला तळोजा कारागृह, झिशान इक्बाल शेख याला ऑर्थर रोड कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
 

पाच कोटींचा मुद्देमाल जप्त

 
पुणे पोलिसांनी आतापयर्र्ंत आरोपींकडून दोन कोटी 14 लाख 30 हजार 600 रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. या अंमली पदार्थाच्या विक्रीतून आरोपींनी आठ किलो सोन्याची बिस्किटे, चार चाकी वाहने आणि महागडे मोबाईल असा एकूण पाच कोटी 11 लाख 45 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज खरेदी केल्याचे पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. तसेच, हा सर्व मुद्देमाल सध्या पोलिसांनी जप्त केला आहे.
 

प्रज्ञा कांबळेला जामीन नाकारला

 
ललित पाटील याची वकिल मैत्रीण असलेल्या प्रज्ञा कांबळेने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्याला सरकारी वकिलांनी विरोध केला. अमली पदार्थांच्या विक्रीतून आलेल्या पैशातून ललित पाटील, अभिषेक बलकवडे आणि भूषण पाटील यांनी प्रज्ञा हिला उदरनिर्वाहासाठी तसेच मोटार आणि महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले आहेत. मोक्का अंतर्गत तिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद सरकारी वकिल साळवी यांनी केला.
 

Related Articles