दोन पोलिसांना अटक   

पुणे : अमली पदार्थ विक्रेता ललित पाटील याच्या ससून रूग्णालयातील प्रलायन प्रकरणी गुन्हे शाखेने दोन पोलिसांना शुक्रवारी अटक केली. ससून रूग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षामध्ये नियुक्तीला असलेल्या दोन पोलिसांवर कर्तव्यात कसूर करून पाटील याला पळून जायला मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटकेतील पोलिस अंमलदारांची नावे आहेत. त्यांच्या अटकेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
 
ललित पाटील याला मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या विक्रीप्रकरणी डिसेंबर 2020 मध्ये चाकण पोलिसांनी अटक केली. त्यानंतर, उपचाराच्या बहाण्याने  अर्थपूर्ण संबंधांच्या मदतीने तो येरवडा कारागृहातून ससूनमध्ये दाखल झाला. ससूनमधील कैद्यांच्या वॉर्डमधून ललित हा मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी 30 सप्टेंबरला ललितच्या साथीदारासह रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली होती. 
 
पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोटींचे मेफेड्रोन जप्त केले होते. तपासात ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचार घेणारा ललित अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपचार घेणार्‍या ललितला नोटीस बजाविण्यात आली. त्याला ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच 2 ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला. 
 
अखेर ललितला अटक झाली. मात्र, या पलायन प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीत दोषी आढळलेल्या बंदोबस्ताला असलेला एक सहायक निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि सात पोलीस अंमलदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. काल ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलीस नाईक काळे आणि जाधव यांना अटक करण्यात आली.
 

Related Articles