शहरात बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाचे सर्वत्र बेकायदा बॅनर   

पुणे : शहरात मुळीक फाउंडेशन यांच्याकडून पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी शहरात अनेक ठिकाणी बेकायदा बॅनर लावण्यात आले असून याविरोधात महापालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाचे आयोजन जगदीश मुळीक यांच्याकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी शहरात मोठे होर्डींग लावण्यात आले आहेत. त्यासोबतच शहरातील विद्युत खांबावर छोट्या आकाराचे जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांसाठी अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या माजी शहराध्यक्षावर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
शहरात विविध सण, समारंभ, वाढदिवस, लग्न सोहळे तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अनधिकृत फलक लावण्यात येतात. त्यावर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येते. शहरात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यासाठी आकाश चिन्ह विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाते.
 
लावण्यात आलेल्या बेकायदा फलकांमुळे शहराच्या सौंदर्यास बाधा येते. बेकायदा फलक लावण्यात आले असतील महापालिकेकडून नक्कीच कारवाई करण्यात येईल.
 
- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त.  
 
जगदीश मुळीक फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे फलक लावण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव आला आहे. प्रस्तावात एकूण 100 फलक लावण्यासाठी परवानगी प्रस्ताव देण्यात आला आहे. फलक लावण्यासाठी दिवसाला प्रती स्व्केअर फुटनुसार 40 रुपये शुल्क आकारले जाते. शुल्क भरल्यानंतरच महापालिकेडून परवानगी देण्यात येते.
 
- माधव जगताप, आकाश चिन्ह विभाग प्रमुख  
 

Related Articles