रस्त्यांच्या कामासाठी २८ कोटी रुपयांच्या पूर्वगणनपत्रकाला महापालिकेची मान्यता   

पुणे : फुरसुंगी येथील टी पी स्कीम मध्ये ताब्यात आलेल्या जागेवर आराखड्यानुसार सर्वप्रथम रस्ते करण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 600 एकर स्किममधील अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी 28 कोटी रुपयांच्या पूर्वगणनपत्रकाला महापालिका प्रशासनाने मान्यता दिली. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
 
महापालिकेने फुरसुंगी आणि देवाची उरूळी या समाविष्ट गावांमध्ये टी.पी.स्कीमला मान्यता दिली आहे. टी.पी.स्कीमबाबतची सर्व आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे.  स्थानिक शेतकरी आणि जागा मालकांच्या सहकार्यामुळे या टी.पी.स्कीमची कार्यवाही बर्‍यापैकी विहित मुदतीत पार पडली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने देखील टी.पी.स्कीमच्या आराखड्या-नुसार अंतर्गत 36 मी. रुंदीच्या रस्त्यांची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. जेणेकरून रस्त्यांची कामे झाल्यानंतर तेथील जागा मालकांना विकसनाची कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
 
पहिल्या टप्प्यात महापालिका 36 मी. रुंदीपैकी 24 मी.चे रस्ते करणार आहे. तसेच दोन्ही बाजूला भविष्यात ड्रेनेज लाईन, सेवा वाहिन्यांसाठीचे डक्ट आणि पदपथांचा विकास करणे सोयीस्कर ठरणार आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या निधीतून 24 मी.चे रस्ते करण्याच्या दृष्टीने सुमारे 28 कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्रक  तयार करण्यात आले आहे. 
 
त्याला आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुर्वगणनपत्रक कमिटीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. यामुळे लवकरच या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात होणार आहे. रस्त्यांमुळे येथील विकासाला देखील चालना मिळणार असून उर्वरीत सुविधा निर्माण करणे सोपे होईल, अशी अपेक्षा पालिकेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली.
 

Related Articles