ओबीसी आरक्षणास धक्का लागू देणार नाही : भुजबळ   

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणास धक्का लागू देणार नाही, याचा पुनरुच्चार राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते  छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केला. 
 
जालन्यातील अंबड येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात भुजबळ यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेवरुन सरकारलाही घरचा आहेर दिला. अंतरवाली सराटी गावापासून 25 किमी अंतरावर हा मेळावा पार पडला. 
 
या मेळाव्यास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राजेश राठोड, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी उपस्थित होते. मराठा आरक्षण मिळत नाही तोवर नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांत नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे फलक लागले आहेत. तसेच, अनेक सत्ताधारी आमदारांच्या घरांना आग लावण्यात आली. त्यावर संताप व्यक्त करताना भुजबळ म्हणाले, मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आली. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. महाराष्ट्र तुमच्या सातबार्‍यावर लिहून देण्यात आला आहे काय? असा सवालही भुजबळ यांनी केला.
 

भुजबळांचे वय झाले...जरांगे यांचे प्रत्युत्तर

 
विटा : छगन भुजबळ यांच्या टीकेला मनोज जरांगे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळ यांचे वय झाले आहे; पण आम्हीदेखील कच्चे नाही. आम्ही तुमचा बायोडेटा काढला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हास धमक्या देऊ नये, असे जरांगे यांनी म्हटले आहे. कोण कुणाचे खात आहे, सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाही. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. तुम्ही लोकांचे पैसे खाता, रक्त पिता? मग तुम्हाला कोण देव मानणार? वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला बोलायला लावू नका, असेही जरांगे म्हणाले.
 

Related Articles