खेळपट्टी सर्वासाठी सारखीच : सुनील गावसकर   

मुंबई : विश्‍वचषकाची उपांत्य फेरी सुरू होण्यापूर्वीच वानखेडे मैदानाच्या खेळपट्टीवरून वाद सुरू झाला होता. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्‍वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. दरम्यान, बीसीसीआयने सामन्यापूर्वी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. याआधी सामन्यात नवीन खेळपट्टी घेतली जाणार होती. आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी अ‍ॅटकिन्सन यांनी सुरुवातीला वानखेडेच्या नवीन खेळपट्टीला मान्यता दिली होती, परंतु नंतर हा निर्णय बदलण्यात आला.
 
या प्रकरणी भारतीय दिग्गज सुनील गावसकर म्हणाले, ही खेळपट्टी सर्व संघांसाठी सामना संपेपर्यंत तशीच राहणार आहे, म्हणूनच मला वाटत नाही की खेळपट्टी कशी खेळेल किंवा काय होईल, यावर जास्त चर्चा व्हावी. मला विश्वास आहे की हा भारतीय संघ कोणत्याही खेळपट्टीवर सामना खेळण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
 
सर्वांनी या स्पर्धेत पाहिले आहे. गावसकर पुढे म्हणाले, जर ती कोरडी खेळपट्टी असेल, जी असण्याची शक्यता आहे, जर पाऊस नसेल येणार तर, तिथे ओलावा राहण्याची शक्यता नाही. खेळपट्टीवर थोडी फिरकी असण्याची शक्यता आहे. पण मुंबईची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी चांगली असते. खेळपट्टी ही सर्वांसाठी सारखीच असते. म्हणूनच मला वाटत नाही की हा मुद्दा इथे लागू पडतो.
 
सुनील गावसकर यांनी भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले आणि म्हणाले, आमच्याकडे ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, मला वाटत नाही की खेळपट्टी ही मोठी समस्या असेल. तुम्हाला सामन्याच्या पूर्वसंध्येला अशा बातम्या नेहमी वाचायला मिळतात. मला असे वाटते की हे सहसा घडते, जेव्हा तुमच्याकडे लिहिण्यासारखे काहीही नसते आणि मग तुम्ही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करता कारण, तुम्हाला स्तंभाची जागा भरायचा असते. मग कुठलेना कुठले कारण काढतात यावेळी त्यांनी खेळपट्टीचा मुद्दा काढला. मला काही फरक पडत नाही. जर नाणेफेकीनंतर खेळपट्टी बदलली असती तर आम्ही त्याबद्दल नक्कीच बोललो असतो. इथे खेळपट्टी नाणेफेकीपूर्वी जी होती तीच आहे. मला वाटत नाही की इथे कोणताही कारण असू नये.
 

मायकेल वॉनने प्रतिक्रिया दिली

 
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने गावसकर यांच्या मताशी असहमती दर्शवली. उपांत्य फेरीसाठी नवीन खेळपट्टीचाच वापर व्हायला हवा, असे त्याचे मत आहे. 
 
वॉनने ट्वीट केले की, विश्वचषक सेमीफायनल नव्या खेळपट्टीवर खेळली जावी. ही एक साधी बाब आहे. मात्र, खेळपट्टीबाबत न्यूझीलंडकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 

Related Articles