अपेक्षा चुरशीच्या सामन्याची   

कौस्तुभ चाटे
 
यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत 45 सामन्यांनंतर उपांत्य फेरीतील 4 संघ समोर आले. अपेक्षेप्रमाणे भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी त्यात बाजी मारली होती. स्पर्धा सुरु होताना गतविजेत्या इंग्लंडची बाजू वरचढ होती, आणि पाकिस्तानचा संघ अशा स्पर्धांमध्ये कायमच धोकादायक असतो. त्यात या स्पर्धेत अफगाणिस्तानने चांगली कामगिरी करत आपल्या उपांत्य फेरीच्या अपेक्षा कायम ठेवल्या होत्या; पण अनपेक्षितरीत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीतील पहिला सामना मुंबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड असा रंगला, तर दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका समोरासमोर आले. हे दोन्ही सामने चांगले झाले आणि खर्‍या अर्थाने या उपांत्य फेरीच्या लढती होत्या असे म्हणता येईल. 
 
मुंबईत झालेला भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना मोठ्या धावसंख्येचा झाला आणि दोन्ही संघांमधील लढत बघायला मिळाली. भारताचा संघ या स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. न्यूझीलंड गत स्पर्धेचे उपविजेते. त्यात 2019 मध्ये त्यांनी भारतीय संघाचा उपांत्य फेरीतच पराभव केलेला. तो पराभव आजही आपल्याला खुपतो. अर्थात न्यूझीलंडचा संघ कायमच मैदानावर आणि बाहेर देखील अत्यंत सभ्य संघ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या पराभवात देखील क्रिकेट रसिक त्यांच्या खेळण्याचेच कौतुक करतात. परवा झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. 
 
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आणि आपले खेळाडू जोषानेच मैदानावर उतरले. रोहित आणि शुभमनची बॅट बोलायला लागली आणि मग न्यूझीलंडच्या गोलंदाजांची लय बिघडलीच. आधी रोहित, शुभमन, पाठोपाठ आलेले विराट आणि श्रेयस यांनी मुंबईच्या त्या खेळपट्टीवर मनसोक्त फलंदाजी केली. विराटने या महत्त्वाच्या सामन्यात आपले एक दिवसाच्या सामन्यांतील 50 वे शतक झळकावले, ते देखील मास्टर ब्लास्टर सचिनच्या साक्षीने. त्या शतकानंतर त्याने सचिनला केलेले वंदन सर्व जगाने बघितले. विराट आणि श्रेयसच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने 397 धावांची मोठी धावसंख्या उभारली, आणि आपण अंतिम सामन्यात प्रवेश करणार याची जणू खात्रीच पटली. 
 
सलामीवीर राचिन रवींद्र आणि कॉनवे बाद झाल्यानंतर कर्णधार विल्यमसन आणि मिचेल यांच्या मनात काही वेगळेच होते. दोघांनी तडाखेबंद फलंदाजीचे प्रदर्शन करायला सुरुवात केली. त्यांनी मारलेले फटके भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांनादेखील धडकी भरवणारे होते. दोघांनीही भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. संपूर्ण स्पर्धेत याआधी भारतीय गोलंदाजांची अशी धुलाई कोणीच केली नव्हती. हे दोघेच आता सामना जिंकून देणार असे वाटत असतानाच विल्यमसन बाद झाला. पाठोपाठ लॅथम गेला आणि आपल्या जीवात जीव आला. 
 
अर्थात मिचेल आणि नंतर आलेला फिलिप्स भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी होतेच. आणि चार-पाच फलंदाज बाद झाल्यानंतर देखील किवी फलंदाजांनी रनरेट कायम ठेवला होता; पण मुळातच भारतीय संघाने उभारलेली धावसंख्या इतकी मोठी होती, की न्यूझीलंडने 327 धावा करून देखील त्यांना 70 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतातर्फे महमद शमीने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने मिळवलेले सात बळी भारतीय गोलंदाजीसाठीचा विक्रम आहेत. शमीची या स्पर्धेतील गोलंदाजी खरोखर दृष्ट लागण्यासारखी आहे. सांघिक खेळाच्या जोरावर 12 वर्षांनी भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता आणि आता त्यांना प्रतीक्षा होती ती प्रतिस्पर्धी संघाची. 
 
दुसर्‍या उपांत्य फेरीत 5 वेळचे विजेते ऑस्ट्रेलिया आणि ’चोकर्स’चा शिक्का बसलेलेे दक्षिण आफ्रिका समोरासमोर होते. दक्षिण आफ्रिकेने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी ते उत्सुक होते; पण त्यांची सुरुवात खराब झाली. या स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेला क्विंटन डी कॉक आणि कर्णधार टेम्बा बवूमा लवकर बाद झाले, पाठोपाठ डूसेन आणि मार्करम देखील माघारी परतले. आफ्रिकन संघ लवकर बाद होणार अशी चिन्हे दिसत असतानाच मधल्या फळीतील क्लासेन आणि मिलरने त्यांचा डाव सावरला. मिलरने अप्रतिम खेळ केला. योग्य वेळी प्रति आक्रमण करीत त्याने आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. दुर्दैवाने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. आफ्रिकन संघ फक्त 212 धावा करू शकला. 
 
अर्थातच ऑस्ट्रेलियासाठी ही धावसंख्या तशी किरकोळ होती, आणि त्यांनी सुरुवात देखील तशीच केली. वॉर्नर आणि हेड जोडीने सहा षटकातच 60 धावांची भागीदारी केली, तेव्हा ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल असेच वाटले होते. पण आफ्रिकेच्या मंदगती गोलंदाजांनी त्यांना वेसण घातली. मार्करम, महाराज आणि शम्सी या तिघांनीही टिच्चून गोलंदाजी केली आणि योग्य वेळी बळी देखील मिळवले. 137 च्या धावसंख्येवर मॅक्सवेल बाद झाला तेव्हा आफ्रिकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पाठोपाठ स्टिव्ह स्मिथ देखील परतला, पण इंग्लिस, कमिन्स आणि स्टार्क या तिघांनी विजयश्री खेचून आणली. 
 
या सामन्यात कधी नव्हे ते आफ्रिकन संघाने गचाळ क्षेत्ररक्षण केले. त्यात कर्णधार बवूमाचे डावपेच देखील चुकले असेच म्हणावे लागेल. डावाच्या सुरुवातीलाच त्याने स्पिनरच्या हातात चेंडू सोपवला असता, आणि त्याने एखादा बळी मिळवला असता तर ऑस्ट्रेलियन संघावर नक्कीच दडपण आले असते; पण ते होणे नव्हते. ऑस्ट्रेलियन संघाला हा सामना जिंकायला त्रास नक्कीच झाला, पण आठव्यांदा त्यांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. 
 
आता रविवारी अहमदाबादच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य आहे आणि त्यांनी अप्रतिम खेळ केला आहे. दुसरीकडे नॉक आऊटला दाखल झालेला ऑस्ट्रेलिया कधीही घातकच असतो. अशावेळी शांत डोक्याने कोणता संघ विजय मिळवतो हे बघणे औत्सुक्याचे असेल. या दोन्ही संघांमधील पूर्वेतिहास आता कामी येणार नाही, पण या स्पर्धेतील विजयी घोडदौड चालू ठेवण्यास भारतीय संघ उत्सुक असेल तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्यास. रोहित शर्माचा भारतीय संघ आणि पॅट कमिन्सचा ऑस्ट्रेलियन संघ यामधील ही लढाई या दशकातील सर्वोत्कृष्ट ठरावी आणि चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवावा अशीच इच्छा 140 कोटी भारतीयांची असेल.
 

Related Articles