पाच दहशतवाद्यांचा खात्मा   

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी गुरूवारी रात्रभर झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे पाच दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.जवळपास 18 तास ही चकमक सुरु होती, असे काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक व्ही.के. बिर्डी यांनी सांगितले.
पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, परिसरात शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
 
कुलमागच्या नेहामा गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने परिसरास घेराव घातला आणि शोधमोहिम सुरू केली. चहुबाजूने वेढले गेल्याने दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यास सुरक्षा दलाच्या जवानांनी  जोरदार प्रत्युत्तर दिले. रात्रीदेखील अधून-मधून गोळीबार सुरू होता. पहाटे जोरदार चकमक उडाली. दहतशातवादी एका घरात लपले होते. त्या घरास आग लागली. त्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले. यात पाचही दहशतवादी मारले गेले.
 
समीर अहमद शेख (पीएएफएफ), यासिर बिलाल भट, दानिश अहमद ठोकर, हनजुल्ला याकूब शाह आणि उबेद अहमद पदर (सर्व टीआरएफ) अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत.
 
शेख हा 2021 मध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. तर, अन्य चौघे नुकतेच दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. सुरक्षा दलाने घटनास्थळावरुन शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे.
 

Related Articles