TCS ने पाठवली दोन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना नोटीस   

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना १५ दिवसांच्या आत नियुक्त ठिकाणी रुजू होण्यास सांगितले आहे. आयटी कर्मचारी संघटना नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने (NITES) ही माहिती दिली.
 
कंपनीने सुमारे महिनाभरापूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयातून काम करणे बंधनकारक केले होते. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या काही ईमेलनुसार, त्यांना ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांची नोटीस देण्यात आली.
 
कंपनीच्या लागू धोरणांवर आधारित कर्मचाऱ्यांना प्रवास आणि निवास खर्च दिला जाईल.ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून कर्मचाऱ्यांना हे ईमेल मिळू लागले. कर्मचार्‍यांनी नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असे वृत्त खासगी वृत्तसंस्थेने दिली.
 
किमान १८० कर्मचाऱ्यांनी NITES कडे तक्रारी पाठवल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनीने योग्य सूचना किंवा चर्चा न करता कर्मचाऱ्यांच्या बदलीचे मेल पाठवले आहेत, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास होत आहे. IT युनियनने आता TCS विरुद्ध कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
 
NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणाले, कंपनी कर्मचार्‍यांच्या सर्व आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या यांकडे दुर्लक्ष करत आहे. TCS कर्मचाऱ्यांना अनावश्यक त्रास देत आहे आणि त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करत आहे.
 

कंपनीने काय उत्तर दिले?

 
कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की हा कंपनीचा निर्णय आहे जो प्रशिक्षण घेतलेल्या फ्रेशर्ससाठी लागू केला गेला आहे, आता कर्मचाऱ्यांना प्रकल्पांवर काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांना कंपनीने उत्तर देण्यास नकार दिला.
 

Related Articles