खाटीक खान्यात नायट्रोजन वायू गळतीमुळे शंभर मजूर रुग्णालयात दाखल   

चंदिगढ: हरयाणाच्या गुरुग्राममध्ये अलवर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मांडीखेडा गावाजवळ असलेल्या मांस फॅक्ट्रीत नायट्रोजन वायू गळती झाली. त्यामुळे शंभरहून जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मजुरांनी गळतीची माहिती व्यवस्थापनाला देताच त्यांचे धाबे दणाणले. मजुरांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
मांडीखेडा गावापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या एलेन फॅक्ट्रीमध्ये वायू गळती झाली. नायट्रोजन वायू गळतीची माहिती मिळताच व्यवस्थापनाने  हालचाली सुरू केल्या. वायू गळती होताच तिथे काम करणाऱ्या मजुरांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. याबद्दलची माहिती मजुरांनीच व्यवस्थापनाला दिली. मजुरांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले.
 
व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे वायू गळतीची घटना घडली. त्यामुळे व्यवस्थापनातील कोणीही माध्यमांकडे प्रतिक्रिया दिलेला नाही. घटनेबद्दल त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देखील दिलेली नाही.
 
नूह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये खाटीक खान्यांची संख्या वेगाने वाढली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ध्या डझनाहून अधिक खाटीकखाने सुरू आहेत. यातील बऱ्याच फॅक्टरींमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले आहेत. एलेना मांस फॅक्टरीतील वायू गळती मागील कारण अद्याप समोर आले नाही.

 

Related Articles