सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन   

मुंबई : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रतो रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. लखनऊमधील सहारा शहरात बुधवारी त्यांचे पार्थिव आणले जाणार असून, तिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवारी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले होते. सुब्रतो रॉय सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.
 
गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांनी १९७६ मध्ये गोरखपूर येथून व्यवसायाला सुरुवात केली. १९९२ मध्ये सहारा समूहाने राष्ट्रीय सहारा नावाचे वृत्तपत्र काढले. याशिवाय कंपनीने ‘सहारा टीव्ही’ नावाचे स्वतःचे टीव्ही चॅनेल देखील सुरू केले होते. कंपनी मीडिया, रिअल इस्टेट, फायनान्ससह विविध क्षेत्रात काम करीत आहे.
 

सुब्रतो रॉय जामिनावर बाहेर होते

 
बरीच वर्षे लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे पैसे कंपनीच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवले होते. मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराश्रींना मोठा दिलासा मिळाला. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुब्रतो रॉय यांच्यावरही असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ते सध्या जामिनावर बाहेर होते. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबत सहारा इंडियाचा दावा आहे की, त्यांनी संपूर्ण रक्कम सेबीकडे जमा केली आहे.
 
सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर राजकीय व्यक्तींपासुन मनोरंजन विश्वातील अनेक व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी 'द केरळ स्टोरी' फेम दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी सुब्रत रॉय यांच्या चरितपटाची घोषणा केली होती. 

Related Articles