संधी काय कमावलेल्या काय गमावलेल्या   

अभिजित खांडकेकर, प्रसिध्द अभिनेते 

 
शाळेत असल्यापासून गणित आणि इंग्रजी या विषयांमुळे घायकुतीला यायचो. कालांतराने इंग्रजीशी मैत्री केली, पण गणिताशी अजूनही परस्पर सामंजस्याने शत्रुत्व बाळगून आहे. गणिताच्या नावडीमुळे अनेक संधी हातून गेल्या. अनेक संधींसाठी प्रयत्नच केले नाहीत. आज अभिनयाच्या जोरावर यश मिळत असले तरी गणित न आवडल्यामुळे निसटलेल्या संधींविषयी मनात रुखरुख आहे. गणिताशी मैत्री केली असती तर आज वेगळीकडे असतो.
 
लहानपणापासून गणित आणि इंग्रजी या विषयांच्या भीतीने माझा पिच्छा सोडला नाही. शाळेत असल्यापासून या दोन विषयांची कमालीची भीती बसली होती. कालांतराने इंग्रजीची भीती गेली. पण गणिताची भीती मात्र अजूनही रुंजी घालते. सुरुवात गणितापासूनच करतो. तर, शाळेत असल्यापासून गणित स्वीकारायचेच नाही असे माझ्या बुद्धीने कदाचित ठरवलेले असावे! शिक्षकांनी पुरेपूर प्रयत्न करूनही गणितात गती आली नाही. मग घरच्यांनी धाकदपटशा दाखवून, भावंडांशी तुलना करून गणिताची गोडी लावण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मनात गणिताची भीती खोलवर रुजली होती असे म्हणायला हरकत नाही. याची सुरुवात झाली चौथीपासून. चौथीची स्कॉलरशिपची परीक्षा, त्यानंतर दहावीची परीक्षा माझ्यासमोर एखाद्या कातळासारख्या उभ्या होत्या. दहावीनंतर मी बाबांसमोर हात जोडून परत कधीच गणित हा विषय घ्यायला लाऊ नका, असा विनवणीवजा हट्ट केला. कारण अकरावीमध्ये कॉमर्स शाखा निवडली तरी गणित विषयाचा ऑप्शन होताच! बाबांनी मला उलट रिक्वेस्ट केली. म्हटले, ‘ही दोनच वर्षे गणिताचा अभ्यास कर, आताच काय ते सहन कर, नंतर या विषयाशी संबंधित शिक्षण घ्यायची आवश्यकता नाही.’ त्यांचे ऐकून अकरावी, बारावी गणित विषय घेतला. कसाबसा अभ्यास केला. बरं, कॉमर्ससारख्या शाखेला गेल्यावर अकाऊंट्स विषयामध्ये, पुढे जाऊन सी.ए., सी.एस. व्हायचे असल्यास गणिताचा पाया पक्का असावाच लागतो. तो नसल्यामुळे गणिताला वेळीच रामराम ठोकला.
 
गणितात गती नसल्यामुळे माझे फार काही अडले नाही. पण गणितामध्ये हातखंडा असेल तर फार साध्या गोष्टींमध्ये सहजता येते हे पदोपदी जाणवत राहिले. आर्थिक व्यवहार असोत, व्यावहारिक ज्ञान असो, फायद्या-तोट्याचे ज्ञान असो, या सगळ्यामध्ये गणिताच्या ज्ञानामुळे एक प्रकारची सहजता येते. ती सहजता मला कधी मिळाली नाही. एक स्वप्न अधुरे राहण्यात या गणिताच्या भीतीचा हात होता. माझी बरीच वर्षे आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती. भारतीय लष्करामध्ये दाखल होण्याची सुप्त इच्छा होती. त्यासाठी वयाचे बंधन जाणून मी प्रयत्नही केले पण, सगळीकडे गणित आडवे आले. अगदी मागच्या वर्षीसुद्धा मी टेरिटोरियल आर्मी (टी.ए.) या पर्यायाचा अवलंब करून लष्करामध्ये जाण्यासाठी परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये इंग्रजी, सामान्य ज्ञान अशा विषयांसोबतच गणिताचीही परीक्षा होती. त्यामुळे इथेही गणिताने माझी निराशा केली. गणित विषयामध्ये गती असती तर कदाचित आर्मीमध्ये जाण्याला वाव होता असे कायम वाटत राहते. आर्मीमध्ये गेलो असतो तर अभिनयाकडे वळलोही नसतो.
 
आता इंग्रजीच्या भीतीबद्दल सांगतो. या क्षेत्रात काम करताना अनेक लोकांशी ओळख होते. सध्या चालू असलेल्या शूटिंगदरम्यान दोन छोट्या मुलींशी ओळख झाली. त्यांच्या अभ्यासाविषयी बोलत असताना बरीच नवीन माहिती मिळाली. त्यांना इंग्रजी किंवा गणित शिकवताना छोट्या छोट्या ट्रिक्सचा वापर केल्याचे समजले. वेगवेगळ्या करामतींमधून अतिशय सोप्या, सहज समजेल अशा पद्धतीने इंग्रजी भाषा शिकवली जाते. अशा वेळी, लहानपणी मला असे शिकवले असते तर इंग्रजीमध्ये रुची निर्माण झाली असती, असे वाटत राहते. उदाहरण द्यायचे झाले तर, आमच्या लहानपणी पहिलीपासून इंग्रजी विषय शिकवला जायचा नाही. त्यामुळे ‘एबीसीडी’शी पाचवीमध्ये ओळख झाली. आता खरे तर इंग्रजीशिवाय पान हलत नाही, पण आम्हाला हा विषय इतक्या उशिरा शिकवला गेला. मागे वळून बघताना याची गंमत वाटते. आता मी या लहान मुलांचे अभ्यासक्रम कुतुहलापोटी बघतो तेव्हा एक लक्षात येते. अवघड वाटणार्‍या विषयांची लहान वयात अतिशय सोप्या पद्धतीने ओळख करून दिली जात आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. यामुळे एखाद्या विषयाची भीती बसत नाही. 
 
हे सगळे सांगण्यामागचा मुद्दा असा की मी पाचवीपासून इंग्रजी शिकायला सुरुवात केली. त्या वयात लहान मुलांमध्ये आपल्या दिसण्याबद्दल, भाषेबद्दल अनेक न्यूनगंड असतात. ते माझ्यामध्ये पुरेपूर होते. त्यावेळी मराठी माध्यमातील आमच्यासारख्या मुलांकडे इंग्रजी माध्यमातील मुले अशी वेगळ्या नजरेने का बघतात हे कळत नव्हते. कालांतराने यामागचे कारण समजले. आम्ही इंग्रजी तर बोलत होतो पण आमचे उच्चार चुकत होते. उदाहरणार्थ, किती तरी वर्षे मी शुद्ध तुपाला ‘पिवर घी’ म्हणायचो, कारण मराठवाड्यात सगळेच तसं म्हणायचे. त्या शब्दाचा उच्चार  ‘प्युअर’ असा आहे हे मला माहितीच नव्हते. त्यामुळे हे चारचौघात बोलल्यावर लोक हसायचे, टर उडवायची. मला शालेय आयुष्यातील किती तरी वर्षे ‘परभणीची भाकर’ म्हणून चिडवले जायचे. पाचवीमध्ये बाबांच्या बदलीमुळे नाशिकला आलो आणि तिथली भाषा, लहेजा हे सगळेच वेगळे असल्यामुळे मला खूप चिडवले गेले. कारण माझ्या भाषेमध्ये परभणीचाच लहेजा होता. त्यामुळे साधारण सहावीमध्ये असताना इंग्रजी सुधारण्याचे मनावर घेतले. वर्तमानपत्रे, रिडर्स डायजेस्टसारखी मासिके असे मिळेल ते वाचून शब्दभांडार वाढवण्याचा प्रयत्न केला. परिणामी, फर्स्ट इयरला प्रजासत्ताक दिनाच्या परेडला इंग्रजीमध्ये निवेदन करण्याची संधी मिळाली.तिथे संपूर्ण जगामधून विद्यार्थी आले होते. ही माझ्यासारख्या विद्यार्थ्याला भारावून टाकणारी संधी होती. यशाची एक पायरी होती. चुकत, धडपडत पण अभ्यासपूर्वक मिळालेले शब्दभांडार अशा अनेक ठिकाणी उपयोगी आले. 
 
आज उच्चारांवरून मी बीड, परभणीचा आहे असे वाटणार नाही. पण यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. इथे एक बाब स्पष्ट मांडाविशी वाटते. एखादी भाषा किंवा लहेजा चुकीचा आहे असे मी कधीच मानले नाही. बीड, परभणीचे मराठी, इंग्रजी चुकीचे आणि पुण्या-मुंबईमधील मराठी बरोबर असे माझे अजिबात म्हणणे नाही. उलट बारा गावचे पाणी प्यायल्यामुळे प्रत्येक गावातील भाषेच्या लहेज्याची गंमत माहिती आहे. सातारा, सांगली, बेळगाव अशा प्रत्येक ठिकाणी भाषेचा लहेजा वेगवेगळा असला तरी बोलण्यात आपुलकी सारखीच आहे. हे सगळे सांगायचा मुद्दा असा, की हे समजण्याचे ते वय नव्हते. शाळेत यातील काहीच समजत नव्हते. आपले भाषेवरील प्रभुत्व वाढायला हवे एवढेच समजत होते. त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले. याचे चीज करियरच्या सुरुवातीलाच झाल्याचे जाणवले. नाशिकला काही काळ एका न्यूज चॅनलमध्ये काम केले. नंतर पुण्यामधील रेडिओ स्टेशनला माझी ‘प्राइम टाइम रेडिओ जॉकी’ म्हणून निवड झाली तेव्हा शाबासकीची थाप मिळाल्यासारखे वाटले. कारण पुण्यात जरासा उच्चार इकडचा तिकडे झाला तरी भुवई वर करून बघितले जाते. त्यामुळे या संधींकडे मी वैयक्तिक यश म्हणून बघितले. हे सर्व मांडण्याचा हेतू असा की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला, इंग्रजी आणि गणिताला घाबरणारा, अभिनयाची कुठलीही पार्श्‍वभूमी नसणारा सामान्य मुलगा हे करू शकतो, तर इतर कोणीही हे करू शकतो. आज अभिनेता म्हणून ओळखले जाते, कामाचे कौतुक केले जाते, तेव्हा या सगळ्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटते. कोणीही असे यश साध्य करू शकते, असा माझा ठाम विश्‍वास आहे. फक्त तीव्र इच्छा आणि प्रचंड मेहनतीची तयारी हवी. 
 
आज अभिनयामध्ये एक स्थान निर्माण केले असले तरी गणित पक्के असले असते तर आज कुठे तरी वेगळीकडे असलो असतो असे सातत्याने वाटत राहते. पण मी याची खंत बाळगत नाही. कारण आयुष्याच्या एका टप्प्यावर पोचलो की वैयक्तिक पातळीवर आपल्याला काय येत नाही याचा अ‍ॅक्सेप्टन्स असायला हवा असे मला वाटते. वयाचा ठराविक टप्पा ओलांडल्यानंतर आपल्याला जमणार्‍या आणि न जमणार्‍या गोष्टींचा प्रामाणिक आलेख मांडता यायला हवा. आपण कोणत्या गोष्टींमध्ये बरे आहोत, कोणत्या गोष्टींमध्ये नाही हे समजायला हवे. हे मान्य केल्यानंतर वैयक्तिक वाढीसाठी काय करायचे आहे हे स्पष्ट होते. मला सध्या वेगवेगळे छंद जोपासायचा छंद लागला आहे. काळाच्या ओघात शिकायच्या राहिलेल्या, राहून गेलेल्या काही कला अवगत करायच्या आहेत. उदाहरणार्थ, एखादे वाद्य शिकायचे राहून गेले आहे. पुस्तके वाचायचा वेळ वाढवायचा आहे. एखाद्या नवीन कलेमध्ये पारंगत व्हायचे आहे. एखादी नवी भाषा शिकायची आहे. परफ्युम तयार करण्याचे तंत्र अवगत करायचे आहे. कॉफी मेकिंगमधील नवीन तंत्रज्ञान शिकायचे आहे. थोडक्यात, सगळ्या विषयांमधील सगळं काही शिकण्याची महत्त्वाकांक्षा आहे. पराकोटीच्या कुतुहलापोटी सतत नवीन काही तरी शिकण्याचा अट्टहास कायम टिकवण्याचा प्रयत्न करायचा मानस आहे. 
 

Related Articles