बासरी शिकायची राहून गेली   

सायली संजीव, प्रख्यात अभिनेत्री 

 
निसटटून गेलेले काही आठवताना नजरेसमोर प्रथम येते ती बासरी. मला बासरी खूप आवडते. बासरी वाजवायला शिकणे, ही माझ्या बकेट लिस्टमध्ये अग्रक्रमावर असणारी बाब होती आणि आजही आहे. खेरीज मी गेले कित्येक दिवस पोहायला शिकायचेदेखील ठरवत आहे. खरे तर अगदी काही दिवसांच्या सरावानेही मी उत्तम पोहू शकते. पण अजूनही हे मला साध्य झालेले नाही.
 
कळते झाल्यापासून समोर आलेल्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देणे, ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणे ही माणसाची मूलभूत भावना म्हणायला हवी. अगदी तान्हे बाळही प्रत्येकाकडे उत्सुकतेने बघत पंचेंद्रियांद्वारे ही बाब समजून घेण्याचा विचार करत असते. जाणीवा समृद्ध होतात तसतसा अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि आपली आवड विकसित होत जाते. वय वाढते तसतसे आवडलेल्या प्रत्येक गोष्टीची अधिकाधिक माहिती करुन घेणे, आवडलेली कला आत्मसात करुन घेण्याचा प्रयत्न करणे, ती शिकणे याचा प्रयत्न सुरू होतो. कालौघात त्यातील काही प्रयत्न यशस्वी ठरतात; काही मात्र मागेच राहतात. कुठे तरी मनाच्या खालच्या कप्प्यात दडून राहतात. पण त्या कधीच नाहिशा होत नाहीत. विसरल्या जात नाहीत. त्यांचे अस्तित्व, आवड, मिळवण्याची आकांक्षा सदोदित ताजी असते. म्हणूनच वेळ मिळेल तेव्हा राहिलेले मिळवण्याचा जोरकस प्रयत्न होताना दिसतो. रुसून असलेले जवळ आणण्यासाठी दोन पावले पुढे टाकली जातात. यातूनच अजूनही रुसून असलेल्या अनेक बाबी हस्तंगत करण्याची इच्छा आशा जागृत करुन जाते.
 
या पार्श्वभूमीवर बघायचे तर निसटून गेलेले काही तपासून पाहताना नजरेसमोर प्रथम येते ती बासरी. मला बासरी खूप आवडते. बासरी वाजवायला शिकणे, ही माझ्या बकेट लिस्टमध्ये अग्रक्रमावर असणारी बाब होती आणि आजही आहे. खरे पाहता बासरी शिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो तितका जास्त वेळ पोहायला शिकण्यासाठी अजिबात द्यावा लागत नाही. अगदी काही दिवसांच्या सरावाने येणारी ही बाब आहे. पण अजूनही ती मला साध्य झालेली नाही. अजूनही या दोन गोष्टी आयुष्यात निसटून गेल्या आहेत, असे म्हणावे लागेल. मध्यंतरी मी पेटीवादनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.  2015 मध्ये मी बासरी वाजवायला शिकण्याची सुरूवातही केली. एक दिवस क्लासलाही गेले पण लगेचच कामाच्या निमित्ताने मला मुंबईला यावे लागले. त्यामुळे ती बाब मागे पडली. पण बासरीची भुरळ काही कमी झाली नव्हती. त्यामुळेच ‘काहे दिया परदेस’च्या सेटवरही मी बासरी घेऊन जात असे. तिथे काही वेळ तरी थोडे शिकायला आणि सराव करायला वेळ मिळेल असे वाटले होते. पण त्या मालिकेत मला दर दिवशी काम असल्यामुळे पुरेसा वेळ देता आलाच नाही. त्यामुळे योजलेली बाब पूर्ण झालीच नाही. त्यानंतर कोरोनाचा काळ सुरू झाला. खरे तर बासरी शिकण्यासाठी तो मला मिळालेला खूप चांगला वेळ होता. पण तरीही काही ना काही कारणांमुळे ते मागेच पडले. प्रसिद्ध बासरीवादक वरद खानापुरकर यांची आणि माझी वेळ न जुळल्याने त्या काहीशा निवांत काळातही ही बाब मागेच राहिली आणि आजही ती मागेच राहिली आहे.
 
मला पेटी वाजवता येते, पण पहिल्यापासूनच बासरी ऐकायला खूप आवडते. त्यामुळेच ऐकून एवढा आनंद मिळत असेल आणि त्या स्वरांनी मनाला एवढी शांतता मिळत असेल तर ती वाजवून किती समाधान वाटेल, हा विचार सतत माझ्या डोक्यात होता आणि आजही आहे. म्हणूनच इतकी वाद्ये आवडत असूनही मला बासरीविषयी विशेष प्रेम वाटते. असे उत्कट प्रेम असल्यामुळे मी बासरी खूप ऐकते. प्रख्यात गायक शंकर महादेवन यांच्याबरोबर काम करणारी रसिका शेखर नामक बासरीवादक तसेच प्रिया या दोघींचेही बासरीवादन मला विशेष आवडते. प्रियाला मी इन्स्टाग्रामवर फॉलोही करते. ‘देबप्रिया’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. या दोघींना सतत ऐकून माझ्यातील बासरीप्रेम वाढले आणि ती शिकायची आस बळकट झाली. त्यांच्यासारखे वाजवता यायला हवे, असे सतत कुठे तरी वाटत असते. ती कोणासाठी वा कुठल्या कार्यक्रमात वाजवायची हा प्रश्न अत्यंत गौण आहे. मुळात सर्वात अधिक शांतता आणि समाधान बासरी ऐकून मिळते हा माझा अनुभव आहे. त्यामुळेच अधिकाधिक वेळा हा अनुभव घेणे आणि त्यात प्राविण्य मिळवणे हे माझे स्वप्न आहे. दुर्दैवाने आजही ते स्वप्नच राहिले आहे. 
बासरीचे सूर अनोखा आनंद देतातच खेरीज बासरी वाजवणार्‍या मुलींची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. या क्षेत्रात पुरुष वादकांचाच भरणा आहे. काही महिला स्वानंदासाठी वा छंद म्हणून बासरी वाजवत असल्या तरी आधी म्हटल्याप्रमाणे कार्यक्रमांमधून बासरी वाजवणार्‍या स्त्री वादकांची संख्या खूपच कमी आहे. त्यातही अन्य वाद्य आणि बासरीमध्ये बराच फरक आहे. पेटी वा अन्य वाद्यांमध्ये तुम्हाला स्वर दिसतात, पण बासरीवर स्वर नाहीत. ते तुम्हाला निर्माण करावे लागतात. त्यासाठी  तसा विचार करावा लागतो आणि तो ध्वनी बासरीला द्यावा लागतो. पेटीवर ‘सारेगमपधनीसा’ आहे. ते समोर दिसतात. त्यासाठी आपल्याला वेगळे काही निर्माण करावे लागत नाही. या नोटला ‘सा’च वाजतो हे आपण जाणतो. पेटीप्रमाणेच पियानो वा अन्य वाद्यांवर सात स्वर असतात. मात्र ते बासरीवर नसते. म्हणूनच हे केवळ बासरीवादन नसते तर त्यामुळे उत्तम मेडिटेशनही घडते. बासरीवादनामुळे तुमची एकाग्रता वाढते. विचार उन्नत होतात तसेच वेगळी ऊर्जा मिळते.
 
माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे. बासरी हे तर श्रीकृष्णाची मुख्य ओळख. त्या नात्यानेही मला बासरी अधिक जवळची वाटते. तसे पहायला गेले तर गणपती हा माझा सर्वात लाडका देव आहे. पण कोणत्याही देवाची गाणी, अभंग यासारख्या बाबी बासरीशिवाय पूर्ण होत नाहीत, हे सत्य आहे. बासरीचे सूर भक्ताचा भक्तिभाव नेमकेपणाने व्यक्त करण्यास मदत करतात. आर्तता, कळकळ, तळमळ, ओढ आदी भावना बासरीतून तंतोतत समोर येतात. म्हणूनच हे वाद्य परमात्म्याप्रतीचा मनोभाव अधिक नेमकेपणाने अभिव्यक्त करु शकते असे मला वाटते.
 
बासरी शिकण्याच्या तीव्र इच्छेमागे हेदेखील एक कारण आहे. तसे बघायला गेले तर आमच्या घरात गायन-वादनाचा वा अभिनयाचा कसालाही संबंध नाही. त्यामुळे मी लहान असल्यापासून बासरी ऐकली, असे काही झाले नाही. पण मी वेगळ्या गोष्टी निवडल्या हे मात्र खरे आहे. 
 
मी अभिनयविश्वात येण्याचा निर्णय घेतला. पण तरीही मला पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण कामाच्या व्यस्ततेमुळे तीदेखील काही काळ रुसून होती. पण आता मात्र मी त्याकडे वळले असून पहिली दोन सत्रे पूर्ण केली आहेत. 2013 मध्ये मी पदवी घेतली. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यास तसा उशीर झाला आहे. पण आता मात्र शुटिंग वा अन्य कोणत्याही प्रकारचा ताण सहन करत हे शिक्षण पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. रुसून असलेली ही गोष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा माझा विचार आहे. खरे सांगायचे तर एकदा शिकण्यातून बाहेर पडलो, शैक्षणिक संस्थेशी संबंध दुरावला की तिथे परतण्याची, नवीन काही शिकण्याची ऊर्मी कमी झाल्यासारखी वाटते. तुम्ही नव्या क्षेत्रात रुळत असता. त्यात रमत असता. त्यामुळेच पुन्हा सुरूवात करताना तुम्हाला नक्कीच फरक जाणवतो. अभ्यास करणे अवघड जाते. एकाग्रता कमी झाल्यासारखी वाटते. पण हे सगळे असूनही मी पुन्हा एकदा शिकायला सुरूवात करण्यामागे वडिलांच्या इच्छेला मान देणे हादेखील एक विचार आहे. मी एमए करावे अशी वडिलांची इच्छा होती. इतकेच नव्हे, तर मी एमपीएसई करावे असादेखील त्यांचा आग्रह होता. तेव्हा ते जमले नाही. पण आज हे शिक्षण घेऊन मी त्यांची इच्छा पूर्ण करत असल्याचा आनंद मिळवत आहे. दुर्दैवाने मागील वर्षी बाबा गेले, पण मी शिकत असल्याचे पाहून ते नक्कीच आनंदी होत असतील असे मला वाटते.
 
बासरी शिकेन तेव्हा आपण स्वत:साठी काही तरी केल्याचा आनंद मला मिळू शकेल. कारण अनेक कामे करत असलो तरी खूपच कमी कामे आपण स्वत:साठी करतो. खरे सांगायचे तर अर्ध्याअधिक गोष्टी आपण इतरांना दाखवण्यासाठीच करत असतो. काही काळानंतर तर आपण स्वत:साठी काय केले, हेदेखील सांगणे कठीण होऊन बसते. असे असताना आपण स्वत:साठी एखादी गोष्ट करणेदेखील खूप मोठी गोष्ट असते. मी मागील काही वर्षांमध्ये घोडेस्वारी शिकले. पेटी तर मी वाजवते. काही काळात मी स्वीमिंगही मी शिकणार आहे. म्हणूनच मी पूर्वीपासून योगासने करायचे. काही वर्षे नेमाने हा नियम पाळला. पण एका अपघातामुळे ते बंद झाले होते. आता तेदेखील सुरू केले आहे. त्यामुळे आता ते रुसून राहिले आहे, असे म्हणता येणार नाही. शेवटी हे सगळे शिकण्यामागील आणखी एक कारण म्हणजे कोणतीही भूमिका आली तर हे मला येत नसल्यामुळे संधी गेली, असे होऊ द्यायचे नाही. त्यामुळे प्रत्येक भूमिकेसाठी परफेक्ट होण्यासाठीही अशा रुसून बसलेल्या अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत.
 

Related Articles