ती महत्वाची भेट   

कथा : सर्वोत्तम सताळकर

 
यू पी राज्याचे आमदार नीलरंजन त्रिपाठी आपल्या गाडीतून एका पोलीस अधिकार्‍याला भेटायला निघाले होते. इतर वेळी त्यांनीच त्या अधिकार्‍यालाच बोलावणं धाडलं असतं; पण आज काम त्यांचं होतं आणि ते नाजूक होतं त्यामुळे कुणालाही न कळवता ते एकटेच त्या अधिकार्‍याला भेटायला आले होते.‘काहीही करून त्या गरीब पोरीचं- दमयंतीचं- डाईंग डिक्लेरेशन आणि तिची चिठ्ठी ज्या अधिकार्‍याकडे आहे त्यालाच पटव आणि जर त्याचं सहकार्य मिळालं तर आणि तरच तू जेलमध्ये जाणार नाहीस. नाही तर मीही तुला वाचवू शकणार नाही.’ मुख्य मंत्र्यांनी त्यांना इशारा दिला होता. आपल्याकडे कामाला असलेल्या गरीब पण सुंदर दमयंतीसाठी आपण वेडे झालो; पण ती बधत नाही हे पाहून संतापाने तिच्यावर बलात्कार केला. यात तसं विशेष नव्हतं; पण नंतर अनपेक्षित घडलं होतं. दमयंतीनं चिठ्ठी लिहिली होती आणि विष घेतलं होतं आणि इतकाच नव्हे, तर एस. पी. गौतम भारद्वाज आणि डॉक्टरांसमोर मरताना आमदार नीलरंजन त्रिपाठीनं आपल्यावर बलात्कार केलाय आणि तोच आपल्या मृत्यूला जबाबदार आहे, असं सांगून प्राण सोडला होता. लगेच गौतमने त्रिपाठी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता आणि त्रिपाठी संकटात आले होते.
 
त्रिपाठींनी दरवाज्याची बेल दाबली. गौतमनं स्वतःच दरवाजा उघडला आणि तो म्हणाला,
‘अरे त्रिपाठीजी, तुम्ही येथे कसे काय?’
‘यावं लागलं. कारण तुझ्याकडे एक काम होतं. दोन दिवसांपूर्वी तू आमच्याविरुद्ध एफआरआर दाखल केला आहेस ना, त्या विषयी बोलायचं आहे.’
‘अच्छा. त्यासाठी होय ? अरे हो, पण आपण असे उभे का? बसा की !’ गौतम म्हणाला.
त्रिपाठी कोचावर बसले आणि त्यांनी लक्ष देऊन गौतमकडे पाहिलं. त्याचा चेहरा निर्विकार होता. एकतर पोलीस अधिकारी लाचारीनं पुढं पुढं करतात किंवा ताठर वागतात; पण गौतमनं यापैकी काहीही केलं नव्हतं. अशा निर्विकार लोकांचा अंदाज लागत नाही.
‘माझ्याविरुद्धचा एफआयआर रद्द कर. दमयंतीची शेवटची चिठ्ठी आणि तिचं टेप केलेलं डाईंग डिक्लेरेशन तू माझ्याकडे सोपव, असा आदेश तुला देण्यासाठी मी आलो आहे.’ त्रिपाठी उन्मत स्वरात म्हणाले. या साध्या एसपीला कशाला मान द्यायचा ?
‘आपला आदेश मी मान्य करू शकत नाही.’ गौतम शांत पण ठाम स्वरात म्हणाला.
त्रिपाठी चकित झाले. यूपीच्या एका आमदाराचा, या नीलरंजन त्रिपाठींचा आदेश हा शिपुर्डा सरळ धुडकावतोय. त्यांनी महत्प्रयासानं आपल्या रागाला आवरलं. बघू या काही आमिष दाखवलं, तर ऐकेल का ?
‘मी तुला पाहिजे तिथं पोस्टिंग आणि प्रमोशन मिळवून देईन. वाटलंच तर चार-पाच लाख कॅश देईन; पण माझं काम झालंच पाहिजे.’
‘बिलकूल होणार नाही.’ गौतम कठीण आवाजात म्हणाला. ‘तुम्ही मला सगळ्यात मोठा अधिकारी केला काय किंवा करोडो रुपये देऊ केले, तरी मी तुम्हाला सोडणार नाही.’
‘लक्षात ठेव. मी मुख्य मंत्र्याच्या मर्जीतला आहे.’
‘त्याची मी पर्वा करत नाही. त्रिपाठी, तुम्ही कितीही प्रयत्न करा, जंग जंग पछाडा, या केसमध्ये तुम्ही तुरुंगात खडी फोडायला जाणार हे नक्की !’ गौतम शांत आवाजात ठामपणे म्हणाला.
त्रिपाठी त्याच्या या वागण्यानं चकित झाले. हा अनोळखी अधिकारी असा शत्रूसारखा का वागतो आहे ?
‘गौतम, तोंड सांभाळून बोल. मी कोण आहे हे तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाही.’
‘मी तुम्हाला व्यवस्थित ओळखतो. तुम्ही एक शक्तिशाली बाहुबली नेते आहात. म्हणूनच वरिष्ठ अधिकार्‍यांना विनंती करून दमयंतीची केस मी मुद्दाम माझ्याकडे घेतली आहे.’
‘मग आता काय करणार आहेस तू?’ त्यांनी उपहासानं विचारलं.
‘सिम्पल! माझ्या हातात दमयंतीचं डाईंग डिक्लरेशन आणि तिची चिठ्ठी आहे. तिच्या आत्महत्येला तुम्हीच जबाबदार आहात, हे मी कोर्टात सिद्ध करीन आणि तुम्ही तुरुंगात जाल.’ 
आता त्रिपाठी खदाखदा हसू लागले.
‘अरे वा ! अँग्री यंग मॅन ! पण तुला काय वाटतं ? ही भ्रष्ट, आतून किडलेली व्यवस्था मला शिक्षा करील ? अरे सोड ! माझ्यासारख्या गुंडाच्या हिंसक कारवाया, हे तर या व्यवस्थेचं इंधन आहे. तू वाटेल ते कर. माझा केसही तू वाकडा करू शकणार नाहीस. काय समजलास मि. गौतम ?’
‘येस ! मला कल्पना आहे की व्यवस्थेचा फायदा घेऊन तुम्ही निसटू शकता ! तसेही तुम्ही आतापर्यंत अनेक गुन्हे करूनही सुटलातच की ! पण याचाही आम्ही लोकांनी विचार केला आहे.’
‘तुम्ही लोक म्हणजे !’
‘त्रिपाठी, तुम्हाला माहीत नाही पण मी स्वतः एका गुंड आणि हिंसक राजकारण्यांचा बळी आहे. माझ्या पत्रकार वडिलांनी भ्रष्टाचार उघड केला म्हणून त्यांची हत्या झाली आहे. माझ्यासारखे अनेक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी. आम्ही एक संघटना बनवली आहे. यात पत्रकार, वकील आणि माझ्यासारखे सरकारी अधिकारी आहेत. तेव्हा तू जो अन्याय दमयंतीवर केला आहेस, त्याची शिक्षा तुला नक्की होणारा !’
‘अरे हट ! अशा किती संघटना आल्या आणि गेल्या. आम्हा राजकारण्यांचा कुणी केसही वाकडा करू शकत नाही. तुला काय करायचं ते कर. मी नक्की या केसमधून सहीसलामत सुटणार !’
‘तसं झालं तर ते तुमचं दुर्दैव असेल.’ गौतम थंडपणे म्हणाला.
‘काय वेड्यासारखं बोलतोयस तू ?’ त्रिपाठी संतापून बोलले; पण त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
‘मी पूर्ण शुद्धीत बोलतोय. आमची संघटना आधी कायदेशीर मार्गाने गुंड राजकारण्यांना सजा देण्याचा प्रयत्न करते; पण जर त्यात अपयशी झालो तर आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची गोळी कुठल्याही क्षणी तुमच्या मेंदूचा वेध घेऊ शकते.’
‘व्हॉट? म्हणजे तुमची संघटना मला बेकायदेशीरपणे मारणार?’ आता मात्र त्रिपाठी घाबरला. गौतमच्या स्वरातलं गांभीर्य, त्याच्या बोलण्यातली सत्यता दर्शवत होतं; पण तरीही उसन्या अवसानाने त्रिपाठी म्हणाले, 
‘असं शक्य नाही. तू खोटं बोलतो आहेस.’ 
‘काही नावं सांगू ? गेल्या दोन वर्षांत सर्वांनंद दुबे, बिलाल अन्सारी आणि रामप्रसाद यादव या गुंड राजकारण्यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. हे आमच्या संघटनेचंच काम आहे.’ 
त्रिपाठी विचारात पडला. बिल्डर सर्वांनंद दुबेवर एका म्हातार्‍या जोडप्याला जागेच्या भांडणात मारल्याचा आरोप होता. वाळू माफियांचा म्होरक्या बिलाल अन्सारीने एका सरकारी अधिकार्‍याला आणि त्याच्या सहायकाला रोलरखाली चिरडला होता; तर रामप्रसाद यादव यांच्यावर एका प्रतिस्पर्ध्याला जिवंत जाळल्याचा आरोप होता. हे तिघेही कोर्टात गुन्हा सिद्ध न झाल्याने निर्दोष सुटले होते. कसाबसा तो म्हणाला,
‘याचा अर्थ ...’
‘याचा अर्थ एकतर दमयंतीचा बलात्कार आणि हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगायची किंवा मग अज्ञात व्यक्तीच्या गोळीनं मरायचं, एवढे दोनच पर्याय तुमच्यापुढं आहेत.’ 
त्रिपाठींना आता भीतीनं घाम फुटला. आपण दोन्ही बाजूंनी कोंडले गेलो आहोत, याची त्यांना जाणीव झाली. त्यांच्या सार्‍या संवेदना गोठून गेल्या आणि ते पुतळ्यासारखे स्तब्ध झाले.
 

Related Articles