कीर्तिकर-रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची आतषबाजी   

शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर

 
मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारासाठी शिवसेनेच्या शिंदे गटातील वरिष्ठ नेते गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात जोरदार जुंपली आहे. गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांनी एकमेकांवर शेलक्या शब्दात टीका करताना परस्परांचा गद्दार, विश्वासघातकी असा उल्लेख केला आहे.
गजानन कीर्तिकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले आहेत. तर त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर ठाकरे गटात आहे. गजानन कीर्तीकर यांनी तब्येतीच्या कारणामुळे येणारी निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अमोल कीर्तीकर ठाकरे गटाकडून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यामुळे रामदास कदम यांनी आपले चिरंजीव सिद्धेश कदम याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे किर्तीकर व रामदास कदम यांच्यात जोरदार जुंपली आहे.
 

कदमांचा इतिहासच गद्दारीचा

 
कीर्तिकर यांनी एक पत्रक काढून रामदास कदम यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. ’रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. 1990 मध्ये मी मालाड विधानसभेतून निवडणुकीला उभा होतो. तेव्हा रामदास कदम खेडमधून निवडणूक लढत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले आणि मला पाडण्यासाठी प्रयत्न केले होते, असा आरोप कीर्तिकर यांनी केला. एवढेच नव्हे तर त्यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम कांदिवली पूर्व मधून महपालिकेची निवडणूक लढत असताना, त्यांना निवडून आणू नका म्हणून सर्व कार्यकर्त्यांना रामदास कदम हे दमबाजी करीत होते, असा आरोपही कीर्तिकरांनी केला आहे.

 

कीर्तिकर विश्वासघात करतील

 
गजानन कीर्तिकर यांच्या आरोपांना रामदास कदम यांनी काल  तिखट शब्दात प्रत्त्युत्तर दिले. कीर्तिकरांचा मुलगा उद्धव ठाकरेंसोबत आहे आणि ते स्वतः एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. बाप-बेटे एकाच कार्यालयात बसतात. दोघे काय करतात हे सगळी दुनिया बघत आहे. त्यामुळे पक्षाशी बेईमानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्वतः उमेदवारी घेऊन घरी बसून मुलाला बिनविरोध निवडून आणण्याची खेळी करून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसतील अशी शंका रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. कीर्तिकरांनी कदम यांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून केला होता. याला उत्तर देताना, ते भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, अशी टीका कदम यांनी केली आहे. 
 

Related Articles