रहमानुल्लाह गुरबाजने गरजूंना मदत करून भारतीयांची मने जिंकली   

अहमदाबाद : सध्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. यादरम्यान देशभरात दिवाळी सणही साजरा केला जात आहे. अशातच अफगाणिस्तान संघाचा स्टार फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने दिवाळीचे औचित्य साधून अहमदाबादमध्ये रस्त्यांवर राहणार्‍या गरजू नागरिकांना पैशाची मदत करताना दिसला. ज्यानंतर त्याची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. यावर आता काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही त्याची दखल घेत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
 
आयपीएलमधील संघ कोलकाता नाईट रायडर्सने या व्हिडिओवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी गुरबाजला जानी म्हटले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपानंतर पीडितांसाठी पैसे गोळा करण्यापासून ते परदेशात अशाप्रकारचे मदत करून, तू आम्हा सर्वांना प्रेरित करतोस. परमेश्वराचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहो, असे म्हटले आहे. 
 

शशी थरूर यांच्याकडून कौतुक

 
दिवाळीच्या पहाटे तीनच्या सुमारास अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज अहमदाबादच्या रस्त्यांवर झोपलेल्या नागरिकांना पैशाची मदत करतानाचा व्हिडिओ एका स्थानिक रहिवाशाने शेअर केला. ज्यावर काँग्रेस नेते शशी थरूरही व्यक्त झाले. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, आपल्या अखेरच्या सामन्यानंतर अफगाण फलंदाजाने रस्त्यांवर राहणार्‍या गरजू नागरिकांसाठी केलेले एक दयाळू कार्य. त्याने आतापर्यंत जितकेही शतक केले आहेत, हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. त्याची कारकीर्दही त्याच्या हृदयासारखी दीर्घ काळ बहरत राहो, असे थरुर यांनी लिहिले आहे. 
 

Related Articles