वाचक लिहितात   

मिठाईतील भेसळीवर नियंत्रण ठेवा

 
सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला मिठाईची देवाणघेवाण होत असते. सणासुदीच्या दिवसात मिठाईला प्रचंड मागणी असते. त्यामुळेच अनेक दुकानदार भेसळयुक्त मिठाईची विक्री करतात. अन्न प्रशासन विभाग अशा भेसळयुक्त मिठाईच्या दुकानांवर छापे घालत असतात. आताही या विभागाची छापेमारी चालू आहे. या विभागाने ज्या दुकानांतून भेसळयुक्त मिठाई जप्त केली, त्या मिठाईत प्रतिबंधित रासायनिक घटकांचा अंश आढळून आला. काही ठिकाणी भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला. सणांच्या दिवसात असे भेसळीचे प्रकार वाढीस लागतात.  ग्राहकांच्या आरोग्याचा विचार न करता भरपूर फायदा मिळवण्याच्या हेतूने असे कुप्रकार केले जातात. अन्न प्रशासन विभागाने भेसळयुक्त मिठाई विकणार्‍या दुकानांवर बारीक लक्ष ठेवावे. स्वतःच्या फायद्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या या नतद्रष्ट दुकानदारांवर कारवाई व्हायलाच हवी. 
 

श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

 

केवळ करिअरला प्राधान्य

 
प्रसिद्ध उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत घटस्फोटाबाबत आणि पती-पत्नीच्या नातेसंबंधांबाबत मत प्रदर्शित करताना म्हटले की, जी लग्न पैशावर किंवा गरजांवर आधारित असतात अशी लग्नबंधने व्यवहार्य नसतात. अर्थातच ती जास्त काळ टिकू शकत नाहीत. मात्र, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम आहे आणि प्रेमाची भावना अग्रस्थानी ठेवून आहे असा व्यक्ती सांसारिक जीवन आनंदाने जगू शकतो. त्यांनी सुखी संसारासाठी मुलाखतीत नवजोडप्यांना एक महत्त्वाचा कानमंत्रदेखील दिला आहे. त्या म्हणतात की, सुख असो वा दु:ख, गरिबी असो, वा श्रीमंती नेहमी कोणत्याही परिस्थितीत आणि कुठल्याही सबबीविना एकमेकांचा आदर करा, एकमेकांवर प्रेम करा. सुधा मूर्तींचे हे मतप्रदर्शन आदर्श वाटत असले, तरी सध्याच्या परिस्थितीत ते कितपत लागू ठरेल याबद्दल शंकाच आहे. कारण सध्याची पिढी ही करिअर केंद्रित असल्यामुळे नातेसंबंधात गुंतून राहण्याला दुय्यम मानते, हे वास्तव आहे. बहुतांश तरुणवर्गाची मानसिकता त्यातच मोडते. त्यातच पाश्चिमात्य विचारसरणीचा पगडा या पिढीवर जास्त असल्यामुळे सुधा मूर्तींचे विवाहसंस्थेविषयीचे विचार त्यांना कितपत रुचतील, कितपत पचनी पडतील हा प्रश्नच आहे.
 

दीपक गुंडये, वरळी.

 

क्षयरोगाच्या रुग्णसंख्येत वाढ

 
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात सन 2022 सालात 75 लाख लोकांना क्षयरोगाची बाधा (टीबी) झाल्याचे समोर आले आहे. जागतिक पातळीवर या रोगाचा वेगाने प्रसार होत असून, या आजारामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या ही जगात दुसर्‍या क्रमांकावर गेली आहे. विशेष म्हणजे भारतात टीबीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण केवळ भारत, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स या तीन देशांमध्ये आढळून आले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या अनेक रुग्णांना वेळेवर टीबीचे योग्य उपचार मिळाले नाहीत.
 

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई  

 

नादुरुत वाहनांचा अडथळा

 
आधीच समृद्धी महामार्गावर अपघाताची शृंखला थांबता-थांबत नाही. दररोज अपघात होत आहेत, तशात या महामार्गावर जाणारे वाहन काही तांत्रिक बिघाडामुळे थांबवले, तर त्या वाहनाला 120 लाइन किंवा 80 किमी लाइन किंवा ओव्हर टेकिंग लाइनवरून तात्काळ हटविण्याची व्यवस्था शासनाने करावी. जेथून एक्झिस्ट  (बाहेर) वाहने  जातात तेथे त्यांची खाली व्यवस्था करावी, म्हणजे समृद्धी महामार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा राहणार नाही. मागच्या आठवड्यात औरंगाबाद ते शिर्डी दरम्यान बरीच नादुरुस्त वाहने या मार्गावर उभी होती, या मार्गावर ज्यांचे नियंत्रण किंवा देखरेख आहे त्यांना विनंती आहे की, अशी नादुरुस्त वाहने या मार्गवरून तात्काळ हलवावी. 
 

धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद

 

डिझेल वाहनांमुळे प्रदूषणात भर

 
राजधानी दिल्ली गेल्या अनेक वर्षांपासून हवेच्या प्रदूषणाच्या समस्येने ग्रस्त आहे आणि तर प्रदूषणाने थैमानच मांडले आहे. ते लोण आता आपल्या निकट म्हणजे मुंबईत येऊन पोहोचले आहे. मुंबईची हवा विषारी व घातक बनली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याचे प्रमुख कारण डिझेलवर चालणारी वाहने हे होय. डिझेलची वाहने नायट्रोजन ऑक्साइड वायू वातावरणात मोठ्या प्रमाणात सोडतात. हा वायू मानवी आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. डिझेलवर चालणार्‍या वाहनांना प्रतिबंध न केल्यास आगामी काळात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. डिझेलमुळे होणार्‍या प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येक वाहनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे सक्तीचे करावे आणि शक्य झाल्यास सतत स्वत:च्याच वाहनाचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करणे ही आता काळाची गरज बनली आहे.
 

अनिल तोरणे, (तळेगाव दाभाडे)

 

दिवाळीच्या बदलत्या संकल्पना 

 
कोणत्याही सणाचे महत्त्व नव्या पिढीला समजावून सांगणार्‍या कुटुंबातील संस्कारक्षम आजी आजोबा यांसारखे ज्येष्ठ सदस्य फारच तुरळक कुटुंबांत आढळून येतात. शहरीकरणामुळे जागेच्या अडचणी आणि एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी स्वतंत्र कुटुंब पद्धती पत्करण्याचा कल यांमुळे आपले सण उत्सव, प्रथा, परंपरा आणि धार्मिक रुढी यांची महती व माहिती पुढल्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास सध्याच्या धावपळीमुळे वेळ अपुरा पडत आहे. घरगुती ताणतणाव, कार्यालयीन, व्यावसायिक जबाबदार्‍या किंवा अन्य कारणे असू शकतात. 
 
दिवाळी म्हणजे बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा या दिवसांपुरतीच लक्षात राहात चालली आहे. लक्षात राहण्याजोगे दुसरे कारण म्हणजे या दिवशी मिळणारी सुट्टी. दिवाळीतील दुसरे काही दिवस म्हणजेच वसुबारस, यम द्वितीया, आश्विन पौर्णिमा, धनत्रयोदशी यांमागील संस्कृती, इतिहास आणि महत्त्व याबद्दल वर्तमानातील पिढी तशी अज्ञानी व अनभिज्ञ राहू नये म्हणून घ्यावयाची खबरदारी सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे. दिवाळीचे औचित्य साधून दागदागिन्यांची, कपड्यांची खरेदी केली जाते. काही घर, वाहन खरेदी करण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त साधतात. कंदील, तोरणे लावून दिव्यांची आरास, रोषणाई, रांगोळ्या काढणे यांत थोडी स्पर्धा दिसून येते, पण आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेणे, एकत्र येऊन फराळाची गोडी अनुभवणे, गप्पा गोष्टींत रमून आनंद घेणे हे पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही.
 
काही जण छोटा सुखी संसार, नवश्रीमंतीचा थाट दाखविण्याच्या नव संकल्पनांना अनुसरून जुन्या रुढी, परंपरा व त्यांचे महत्त्व यांना छेद देतात. तिथेच सण साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धती कालबाह्य होत आहेत. दुसरीकडे छोट्या कुटुंबातील सदस्य फटाक्यांच्या आवाजाच्या आणि प्रदूषणाच्या त्रासापासून बचावासाठी वातानुकूलित घरात मोबाइल फोन, टीव्ही किंवा संगणक यांच्या साथीने दिवाळी सणाचा व सुट्टीचा आनंद लुटत असतात. जुन्या परंपरांना छेद देणारी नवी प्रथा सुरू झाली आहे ती म्हणजे बाजारातील रेडीमेड फराळ, गोड पदार्थ खरीदण्याची. यामुळे बर्‍याच घरांतून घरगुती फराळ बनविण्याचा आटापिटा केलाच जात नाही. घरगुती फराळाला पर्याय म्हणून कित्येक कंपन्या रेडीमेड फराळ, सुकामेवा आकर्षक वेस्टने, पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देत आहेत. सणांच्या निमित्ताने केल्या जाणार्‍या सततच्या जाहिरातबाजीच्या प्रभावामुळे आगामी काळात फक्त दिवाळसणच नव्हे, तर इतर सणांच्या दिवशी बाजारातील तयार पॅकड् खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे अशा प्रकारच्या नव्या प्रथा रुजण्याच्या शक्यता वाढत आहेत. यालाच कालाय तस्मै नमः असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 

स्नेहा राज, गोरेगांव.

 

Related Articles