आता आमचे घर कोणी फोडले?   

अजित पवार यांचा सवाल

बारामती, (वार्ताहर) : मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. जी चूक मी केली होती, ती मान्य करतो. पण आता चूक कोणी केली?, फॉर्म कोणी भरायला सांगितला. तर, पवार साहेबांनी फॉर्म भरायला सांगितला, म्हणजे साहेबांनी आमचे तात्या साहेबांचे घर फोडले नाही का? असा सवाल करताच अजित पवार यांना सोमवारी सभेत अश्रू अनावर झाले. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत काल शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर परंपरेप्रमाणे कन्हेरी येथे सभेत ते बोलत होते. 
यावेळी अजित पवार म्हणाले, मागे माझी चूक झाली होती. ती मी कबूलही केली. आम्ही तात्या साहेबांचे कुटुंब. बिकट परिस्थितीतून वर आलेलो. खुद्द आईने सांगितले होते, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. पण साहेबांनी फॉर्म भरायला लावला. म्हणजे साहेबांनी तात्या साहेबांचे कुटुंब फोडले. आम्ही जीवाला जीव देणारी माणसे आहोत. एकोपा टिकवायला पिढ्यान्पिढ्या जातात. मात्र, तोडायला वेळ लागत नाही.    
 
विरोधकांच्या ‘मलिदा गॅंगवर अजित पवार म्हणाले, कोणतेही काम स्थानिकाला दिले तरी त्यावर माझा कटाक्ष असतो आणि ती दर्जेदार करण्यावर माझा भर असतो. माणूस आहे, चुका करतो आणि स्वीकार ही करतो. तुम्ही मला मोठे केले, वरच्या पदावर नेले. वरिष्ठ नेते कसे काम करतात, प्रशासन कसे राबवतात हे मला पाहाता आले. मी जनतेला काय देता येईल याचा विचार करतो. मला यावेळी निवडणुकीला उभे रहायचे नव्हते, ती नौटंकी वगैरे काही नव्हती; पण, कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका घेतल्याने मी विचार बदलला, ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सुटली आणि आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला

हा अजित पवार आता पूर्वीचा नाही; लोकसभेनंतर बदलला आहे. त्यामुळे, आता मी सबुरीने घेतो, तुम्ही देखील सबुरीने घ्या. टोकाचा निर्णय घेऊ नका; कोणाचा अपमान होईल, असे वागू नका, असा सबुरीचा सल्ला अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना दिला. 
 

Related Articles