दौंडमध्ये शरद पवार देणार आयात उमेदवार   

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने शनिवारी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, त्यामध्ये दौंड विधानसभेसाठी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. या पक्षाकडे उमेदवारीसाठी पाच इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यातील चौघाजणांनी माघार घेऊन आप्पासाहेब पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, तरीही त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात न आल्याने बाहेरील पक्षातून आयात उमेदवारांस उमेदवारी मिळण्याची दाट शयता वर्तविण्यात येत आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे जुन्नरमधून ६ ते ७ जण इच्छुक होते. त्यांना डावलून शरद पवारांनी काँग्रेसमधून आयात केलेल्या सत्यशील शेरकर यांना उमेदवारी बहाल केली. या पार्श्वभूमीवर सध्या दौंडमधून जे इच्छुक आहेत. त्यांच्या ताकदीवर पक्ष ही जागा जिंकू शकणार नाही, या शयतेने बाहेरील पक्षांतून आयात करून त्या उमेदवारांस संधी देण्याची मानसिकता पक्षश्रेष्ठींची झाली आहे. त्यादृष्टिने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. थोरात हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जवळचे असून, त्यांनी विविध मार्ग वापरून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, आतापर्यंत शरद पवारांनी त्यांचा विचार केला नाही. आता मात्र, त्यांच्या नावाबाबत सकारत्मकता दिसून येऊ लागली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आघाडीला चांगले वातावरण आहे. ग्रामीणमधून महायुतीला यश मिळू नये, यासाठी पवारांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे रमेश थोरात यांनी तर शरद पवारांनी आपल्या नावाचा विचार न केल्यास राष्ट्रीय समाजपक्ष अथवा वंचित विकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या परिस्थितीत राहुल कुल यांना पराभूत करण्यासाठी रमेश थोरात यांना शरद पवारांकडून उमेदवारी मिळण्याची शयता वाढली आहे. थोरात समर्थक तुतारी फुंकण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Related Articles